“रस्ता कमी, कोडे जास्त! नळदुर्गचा पूल बनला ‘लाइव्ह अ‍ॅडव्हेंचर पार्क’”

नळदुर्ग, दि. २५ जून :

नळदुर्ग बाह्यवळणावरील पूल हा वाहतुकीसाठी बांधला की वाहनचालकांच्या धाडसाची परीक्षा घेण्यासाठी, हा प्रश्न आता प्रवाशांना पडू लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बहुधा "अपघात टाळण्यासाठी रस्ता" या संकल्पनेऐवजी "अपघात कसा घडू शकतो?" याचा प्रत्यक्ष नमुना उभारला असावा, अशी चर्चा परिसरात रंगली आहे.

पूलाजवळ पोहोचलेल्या चालकाला प्रथम प्रार्थना करावी लागते, नंतर अंदाज घ्यावा लागतो आणि शेवटी नशिबावर भरोसा ठेवून वळण घ्यावे लागते. कारण येथे रस्ता कमी आणि कोडे जास्त आहे. मोठ्या वाहनांच्या चालकांची अवस्था तर "एक पाऊल पुढे, दोन पाऊल मागे" या जुन्या गाण्यासारखी झाली आहे. वाहन वळवताना ट्रक मागे घ्या, पुन्हा पुढे घ्या, पुन्हा मागे घ्या... तोपर्यंत मागच्या वाहनांच्या रांगा किलोमीटरभर वाढलेल्या असतात.
सर्व्हिस रोड बंद असल्याने चालकांना मुख्य महामार्गावरच जीव मुठीत धरून वळावे लागते. प्रशासनाच्या दृष्टीने कदाचित हा "साहसी पर्यटन" प्रकार असावा. कारण प्रत्येक वळणावर थरार, प्रत्येक क्षणी सस्पेन्स आणि समोरून येणाऱ्या वाहनामुळे हृदयाची धडधड वाढवणारा अनुभव येथे मोफत मिळतो.

स्थानिक नागरिक सांगतात की येथे यापूर्वी अपघात झाले आहेत. मात्र प्रशासनाचा दृष्टिकोन पाहता, अपघात हा बहुधा अधिकृतपणे मोठा होईपर्यंत अपघात मानला जात नसावा. त्यामुळे "आधी अपघात, मग उपाययोजना" हेच सूत्र अद्याप कायम असल्याचे दिसते.

वाहतूक तज्ज्ञांनी गोलाकार जंक्शन, दिशादर्शक फलक, हायमास्ट दिवे, सुरक्षा आरसे आणि सर्व्हिस रोड सुरू करण्याच्या मागण्या केल्या आहेत. पण या मागण्या मंजूर होईपर्यंत एखादा नवीन समिती अहवाल, त्यावर अभ्यासगट, त्यावर उपअभ्यासगट आणि शेवटी फाईलचा पर्यटन दौरा पूर्ण होण्याची शक्यता अधिक असल्याचे नागरिक उपरोधिकपणे सांगतात.
 
Top