नळदुर्गचा आठवडी बाजार ओस पडण्याच्या मार्गावर; मूलभूत सुविधांच्या अभावामुळे व्यापारी-शेतकऱ्यांची पाठ फिरली,
नगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी

नळदुर्ग, दि. २५ :

एकेकाळी तुळजापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या व गजबजलेल्या बाजारपेठांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा नळदुर्गचा रविवारचा आठवडी बाजार आज अस्तित्व टिकविण्याच्या संघर्षात असल्याची खंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख संतोष पुदाले यांनी व्यक्त केली आहे.

"तुळजापूर लाईव्ह"शी बोलताना त्यांनी सांगितले की, पूर्वी तुळजापूरनंतर नळदुर्गचा आठवडी बाजार तालुक्यात विशेष महत्त्वाचा मानला जात होता. परिसरातील अनेक गावांमधून शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने येथे येत असत. मात्र, सध्या विविध गावांमध्ये स्वतंत्र आठवडी बाजार सुरू झाल्याने नळदुर्गच्या बाजारातील गर्दी लक्षणीयरीत्या घटली आहे.
पुदाले  यांनी सांगितले की, पूर्वी नगरपालिका भाजीपाला विक्रेत्यांकडून नाममात्र दोन रुपये कर आकारत होती. मात्र, कर वसुलीचे ठेके देण्याची पद्धत सुरू झाल्यानंतर काही ठेकेदारांकडून शेतकरी व व्यापाऱ्यांकडून २० ते ३० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अनेक व्यापारी व शेतकरी नळदुर्ग बाजाराकडे पाठ फिरवत असल्याचे त्यांनी नमूद केले.

त्यांच्या मते, बाजाराच्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असून पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत. ग्रामीण भागातून भाजीपाला व फळे विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना बसण्यासाठी योग्य जागा मिळत नसल्याने त्यांना गटारीलगत अथवा अस्वच्छ परिसरात व्यवसाय करावा लागत आहे. त्याचबरोबर बाजारात शेतकऱ्यांना जागेवरून स्थानिक विक्रेत्यांकडून नाहकच त्रास देवुन सतत तक्रारी, वाद होत असल्यामुळे  शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनेक व्यापारी व शेतकऱ्यांनी बाजार स्वच्छ व प्रशस्त जागेत भरविण्याची मागणी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडे केली असल्याचेही पुरावे यांनी सांगितले. मात्र, या प्रश्नाकडे अद्याप गांभीर्याने लक्ष दिले गेले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
सध्या नळदुर्गच्या आठवडी बाजारात पूर्वीच्या तुलनेत केवळ २५ टक्के व्यापारी व शेतकरी उपस्थित राहत असल्याचा दावा त्यांनी केला. याउलट अणदूर व जळकोट येथील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापारी आणि ग्राहकांची गर्दी होत असून तेथे स्वच्छ व ताजा भाजीपाला उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.

बाजार परिसरात रस्त्याच्या कडेला व रस्त्यावरच फळविक्रेत्यांनी गाड्या उभ्या केल्याने महिला ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. बाजार व्यवस्थापनातील त्रुटी, अस्वच्छता आणि सुविधांचा अभाव यामुळे व्यापारी, शेतकरी व ग्राहक नळदुर्गच्या बाजारापासून दूर जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर नळदुर्ग नगरपालिका प्रशासनाने बाजार व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन स्वच्छता, पिण्याचे पाणी, विक्रेत्यांसाठी योग्य जागा आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी संतोष पुदाले यांनी केली आहे.


 
Top