नळदुर्ग नगरपरिषदेच्या आर्थिक व्यवहारांची निष्पक्ष तपासणी करा; रखडलेल्या लेखा परीक्षणात धक्कादायक बाबींची चर्चा; मुख्य लेखा परीक्षकांकडे निवेदन
नळदुर्ग, दि. ११ :
नळदुर्ग नगरपरिषदेचे सन २०२२ पासून रखडलेले लेखापरीक्षण सखोल, निष्पक्ष व सर्वसमावेशक पद्धतीने करण्यात यावे, अशी मागणी पत्रकार शिवाजी नाईक यांनी स्थानिक निधी लेखा विभागाच्या मुख्य लेखा परीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नळदुर्ग नगरपरिषदेचे गेल्या चार वर्षांपासून नियमित लेखापरीक्षण झालेले नाही. सध्या रखडलेल्या लेखापरीक्षणाचे काम सुरू असताना काही धक्कादायक बाबी समोर येत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे लेखापरीक्षण प्रक्रियेबाबत नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर १० जून रोजी लेखापरीक्षणाचे काम पाहणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांची नगरपरिषद कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन कामकाज पारदर्शक, नियमबद्ध व समाधानकारक पद्धतीने पार पाडण्याची विनंती करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नगरपरिषदेच्या आर्थिक व्यवहारांबाबत कोणताही संभ्रम राहू नये तसेच भविष्यात वाद, गैरसमज किंवा आर्थिक अनियमिततेबाबत प्रश्न निर्माण होऊ नयेत, यासाठी मुख्य लेखा परीक्षकांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून सखोल लेखापरीक्षण करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.