धाराशिव : "ऊसतोड कामगारांना" प्रमाणपत्र देण्याबाबत ग्रामपंचायत अधिकारी यांना जिल्हाधिकारीनी निर्देश द्यावेत -सुरेश पवार
धाराशिव,दि.०६ जुन
महाराष्ट्र राज्यातील ऊसतोड कामगारांना त्यांचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ऊसतोड महामंडळा निर्मित करण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व विविध सुविधा मिळवून देण्यासाठी ऊसतोड कामगारांचे सर्व्हे करून नोंदणी करणे व ओळखपत्र वितरित करण्यासाठी खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
ऊसतोड कामगारांना सदस्य नोंदणी अभियानात सहभाग नोंदविण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील गाव पातळीवरील ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवक यांचे ऊसतोड कामगाराना "ऊसतोड कामगार" असल्याबाबत प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक आहे. महामंडळा मार्फत नोंदणी प्रक्रिया सोपविण्यात आलेल्या में. स्मार्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे, या कंपनीस संगणकीय प्रणालीद्वारे ग्रामसेवक यांचे ऊसतोड कामगार असल्याचे प्रमाणपत्र नोंदणी करण्यासाठी अनिवार्य असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी धाराशिव जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांना ऊसतोड कामगार यांना ऊसतोड कामगार प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देण्यात यावे. याकरिता तुळजाभवानी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निवेदन दि.०५ जुन रोजी देण्यात आले. यावेळी तुळजाभवानी ऊसतोड कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांच्यासह किरण राठोड,महादेव राठोड, नामदेव राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.