धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात वटपौर्णिमा साजरी; सौभाग्यवती महिलांनी वडाच्या वृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले व्रत; मंदिर परिसरात भाविकांची गर्दी


धाराशिव,दि.२९:

जिल्ह्यात सोमवारी वटपौर्णिमेचा सण मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागात सकाळपासूनच सौभाग्यवती महिलांनी पारंपरिक वेशभूषेत वडाच्या वृक्षाची विधीवत पूजा करून पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी प्रार्थना केली.
श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटेपासूनच महिलांची गर्दी दिसून आली तसेच विविध मंदिर परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वडाच्या वृक्षांजवळ महिलांची मोठी गर्दी दिसून आली. महिलांनी हळद, कुंकू, फुले, अक्षता, फळे, नैवेद्य अर्पण करून वडाच्या वृक्षाला पवित्र दोरा गुंडाळत प्रदक्षिणा घातल्या. यावेळी सावित्री-सत्यवानाची कथा श्रवण करून वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व सांगण्यात आले.

जिल्ह्यातील तुळजापूर, धाराशिव, उमरगा, परंडा, कळंब, भूम, लोहारा आणि वाशी तालुक्यांमध्ये वटपौर्णिमेनिमित्त मंदिर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. अनेक महिलांनी पारंपरिक नऊवारी साडी, दागिने आणि फुलांनी सजून पूजाविधी पार पाडल्याने सणाला विशेष आकर्षण लाभले.काही ठिकाणी महिला मंडळांच्या वतीने सामूहिक पूजा, सावित्री सत्यवान कथावाचन तसेच धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

महिलांनी एकमेकींना हळद-कुंकू लावत वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. सामाजिक सलोखा आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणारा हा सण जिल्हाभर आनंदात साजरा झाला.

वटपौर्णिमा हा सण पती-पत्नीतील विश्वास, निष्ठा, प्रेम आणि परस्पर सन्मानाचे प्रतीक मानला जातो. आधुनिक काळातही या परंपरेचे जतन करत महिलांनी श्रद्धा आणि उत्साहाने व्रत पाळल्याने जिल्हाभर धार्मिक आणि मंगलमय वातावरण अनुभवायला मिळाले.
 
Top