नसरापूर प्रकरणातील आरोपीस फाशीची शिक्षा; निर्णयाचे नळदुर्ग शहरात स्वागत
नळदुर्ग, दि. २९ जून :
पुणे येथील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीस पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयाचे नळदुर्ग शहरात विविध स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
सदर प्रकरणात भीमराव कांबळे या आरोपीने अमानुष कृत्य करत चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. समाजमनाला हादरा देणाऱ्या या प्रकरणाचा न्यायालयाने जलदगतीने निकाल लावत आरोपीस कठोर शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे हा खटला जलदगतीने निकाली निघालेल्या प्रकरणांपैकी एक म्हणून ओळखला जात आहे.
या निर्णयानंतर समाजातून समाधान व्यक्त केले जात असून, अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर वचक बसण्यासाठी या शिक्षेची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणीही होत आहे.
दरम्यान, नळदुर्ग येथे ब्राह्मण समाज संघटनेच्या वतीने या घटनेचा निषेध करत निवेदन देण्यात आले होते. तसेच नागरिकांच्या सहभागातून निषेध मोर्चाही काढण्यात आला होता. या घटनेने माणुसकीला काळिमा फासल्याची भावना व्यक्त होत असताना आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत होती.
न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत पेशवा युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी यांनी सांगितले की, “आरोपीस दिलेली मरेपर्यंत फाशीची शिक्षा ही योग्य असून तिची लवकरात-लवकर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे कायद्याचा धाक निर्माण होईल व भविष्यात अशा घटना घडण्यास आळा बसेल.”