टिप्परला दुचाकीची भीषण धडक; उपचारापूर्वीच दुचाकीस्वाराचा मृत्यू

नळदुर्ग,दि.२९ जुन:

नळदुर्ग शहरातील जुन्या राष्ट्रीय महामार्गावर सितारा हॉटेलसमोर सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, नळदुर्गहून खंडोबा मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या जुन्या महामार्गावर दुपारी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकी (क्र. एमएच-१३ बी.वाय-५६०४) चालविणारे परमेश्वर महादेव गायकवाड (वय ४५, रा. किलज, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी समोरील टिप्परला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेचे चालक सुनिल भोळे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीस तातडीने नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेंद्र मडके यांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच परमेश्वर गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. अपघाताचे नेमके कारण आणि पुढील तपास संबंधित पोलीस करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे किलज गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.


 
Top