अनेक वर्षांनंतर हगलूर गावात धावली 'लालपरी'; विद्यार्थिनींच्या शिक्षणाला मिळाले नवे पंख!
नळदुर्ग–हगलूर–मानेवाडी बससेवेचा शुभारंभ; हलगीच्या गजरात जल्लोष, एसटी कर्मचाऱ्यांचा सत्कार
नळदुर्ग, दि. २९ जून :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या, विशेषतः मुलींच्या शिक्षणातील वाहतुकीची मोठी अडचण अखेर दूर झाली असून, नळदुर्ग–हगलूर–मानेवाडी या मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) नवीन बस सेवा सोमवारपासून सुरू करण्यात आली.
या निर्णयामुळे नळदुर्ग येथे महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच हुतात्मा बाबुराव बोरगावकर विद्यालय (साखर कारखाना परिसर) येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरक्षित आणि नियमित सार्वजनिक वाहतुकीअभावी विद्यार्थिनींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते, तर काहींच्या शिक्षणावरही त्याचा परिणाम होत होता. नव्याने सुरू झालेल्या एसटी बस सेवेमुळे आता विद्यार्थिनींना सुरक्षित, सुलभ आणि किफायतशीर प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
हगलूरचे सरपंच अॅड. जयपाल पाटील यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांना यश मिळाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. हा निर्णय केवळ वाहतुकीची सुविधा नसून ग्रामीण मुलींच्या शिक्षणाला नवी दिशा देणारा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
अनेक वर्षांनंतर गावात आली एसटी; हलगीच्या गजरात जल्लोष
हगलूर आणि मानेवाडी या दोन्ही गावांमध्ये नव्या बसचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. हलगीच्या गजरात बसचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी चालक मेहराज पटेल, वाहक विष्णू माळी तसेच नळदुर्ग वाहतूक नियंत्रक अनिल हांडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांनंतर गावात एसटी बस दाखल झाल्याने ग्रामस्थांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी उपस्थितांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
'लालपरी'लाच प्राधान्य देण्याची ग्रामस्थांची ग्वाही
हगलूर व मानेवाडी ग्रामस्थांनी यापुढे शक्यतो खासगी वाहनांचा वापर टाळून एसटीनेच प्रवास करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे नव्याने सुरू झालेली बस सेवा नियमित आणि टिकाऊ राहण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
विद्यार्थिनीचे मनोगत ठरले लक्षवेधी
हगलूर येथील विद्यार्थिनी राजनंदिनी मनोहर घुगे हिने मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "आमच्या गावात बस सुरू झाल्याने हगलूर पाटी ते गाव असा तीन किलोमीटरचा रोजचा पायी प्रवास वाचला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेचा आम्हा ग्रामीण भागातील मुलींना मोठा लाभ होत असून, शिक्षणासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे."
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास हगलूरचे सरपंच अॅड. जयपाल पाटील, मानेवाडीचे सरपंच माने, हुतात्मा बाबुराव बोरगावकर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार नरवडे, मल्लय्या स्वामी, उमाकांत मोरे, उपसरपंच महेश गवळी, माजी सरपंच नालंदा पाटील, रंभाजी घुगे, मनोहर घुगे, दिनकर घुगे, संतोष दराडे, प्रमोद कांबळे यांच्यासह दोन्ही गावांतील विद्यार्थी, पालक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी ही बस सेवा 'जीवनदायिनी' ठरणार असून, शिक्षणाचा प्रवास आता अधिक सुरक्षित, सुलभ आणि आत्मविश्वासपूर्ण होणार असल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.