"काम सरकारी... नाव पत्रकारांचे... 'वन मॅन शो'च्या नव्या कारनाम्याची नळदुर्गमध्ये जोरदार चर्चा!"
नळदुर्ग, दि. २ जुलै:
प्रशासकीय राजवटीत "वन मॅन शो" सुपरहिट ठरलेल्या लफडेकर अधिकाऱ्याचा आणखी एका नव्या कारनाम्याची शहरभर चांगलीच रसभरीत चर्चा रंगली असून, "पुढचा अंक कधी?" याचीच आता नागरिक उत्सुकतेने वाट पाहत आहेत!
नळदुर्गमध्ये सध्या विकासकामांची चर्चा कमी आणि ‘चिरीमिरी विकास योजना’ जास्त चर्चेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे! प्रशासकीय राजवटीत शहराचा कायापालट होईल, या अपेक्षेने नागरिकांनी डोळे लावले होते; पण इथे काहींचे ‘हात’च आधी भरू लागल्याची चर्चा रंगली आहे.
आमदारांनी शासन दरबारी विशेष प्रयत्न करून कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणला. नागरिकांनीही आनंदाने “आता तरी रस्ते, नळ आणि कामे वेळेत पूर्ण होतील” असा विश्वास ठेवला. टेंडर निघाले, कामांचे वाटप झाले आणि सगळं काही नियमाप्रमाणे सुरू असल्याचं दाखवलं गेलं.
पण पडद्यामागची ‘खरी स्क्रिप्ट’ मात्र वेगळीच असल्याची कुजबुज सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्याने ठेकेदारांकडून चिरीमिरी उकळण्यासाठी थेट पत्रकारांच्या नावाचाच ‘पास’ वापरल्याची चर्चा शहरभर रंगली आहे. म्हणजे काम सरकारी, नाव पत्रकारांचं आणि फायदा कुणाचा , हा सवाल आता चहाच्या टपऱ्यांपासून ते चौकाचौकात गाजू लागला आहे.
नागरिकही आता मिश्कीलपणे म्हणू लागले आहेत, “नळदुर्गमध्ये विकासकामांपेक्षा ‘कमिशनचं नेटवर्क’ जास्त मजबूत आहे!” काही जण तर याला ‘डिजिटल इंडिया’च्या धर्तीवर ‘कमिशन इंडिया’ म्हणत असल्याचं ऐकायला मिळत आहे.
एकंदर, विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेल्या या चर्चेला जर चौकशीची जोड मिळाली, तर ‘कोणाचा विकास’ झाला, याचं खरं चित्र समोर येणार यात शंका नाही!