उमरगा–नळदुर्ग–अक्कलकोट बससेवा नियमित सुरू करण्याची शिवसेना उबाठाची मागणी
नळदुर्ग, दि. २ जुलै :
उमरगा आगाराच्या डेपोची उमरगा–नळदुर्ग–अक्कलकोट ही एस.टी.बससेवा नियमितपणे सुरू ठेवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेने उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी विभाग नियंत्रक, धाराशिव यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, उमरगा आगाराची ही बस सकाळी १२ वाजताच्या सुमारास धावते. मात्र ही बस अनेकदा वेळेवर येत नसल्याने अथवा काही दिवस पूर्णपणे बंद राहत असल्याने विद्यार्थी, भाविक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः शाहापूर, गुजनूर, वागदरी, सुलतानपूर, ब-हाणपूर या मार्गावरील विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
एस.टी.बस बंद असल्याबाबत चौकशी केली असता "बस खराब आहे" असे कारण सांगितले जात असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. आगार प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन संबंधित बससेवा तातडीने नियमित सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
बससेवा त्वरित सुरू न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. तसेच उमरगा आगाराची कोणतीही बस नळदुर्ग बसस्थानकात प्रवेश करू दिली जाणार नाही, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
हे निवेदन शिवसेना नळदुर्ग शहरप्रमुख संतोष पुदाले, उपतालुका प्रमुख सरदारसिंह ठाकूर, उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, उपशहर प्रमुख श्याम कनकधर, सोमनाथ म्हेत्रे, शहराध्यक्ष नेताजी महाबोले यांच्या स्वाक्षरीने नळदुर्ग वाहतुक नियंत्रक अनिल हांडे यांना देण्यात आले.यावेळी निवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय वाघमारे उपस्थित होते.