नळदुर्गात भू-माफियांचा महाघोटाळा? सरकारी जागांचीही विक्री; जनहित याचिकेचा इशारा
नळदुर्ग, दि. ४ जुलै :
नळदुर्ग शहरात भू-माफियांनी तत्कालीन नगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांच्या कथित संगनमतातून बेकायदेशीर गुंठेवारीसह शासनासाठी राखीव ठेवलेल्या जागांचीदेखील सर्रास विक्री केल्याचा गंभीर आरोप पुढे आला असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शहरातील काही प्रभावशाली राजकीय व्यक्ती आणि भू-माफियांची कथित भागीदारी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत असून, या माध्यमातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेतील हस्तांतरण (नामांतर) विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने अनेक वादग्रस्त आणि कथित बेकायदेशीर मालमत्तांच्या नोंदी करण्यात आल्याचीही चर्चा शहरात सुरू आहे.
शहरातील अनेक शेतकऱ्यांना विविध आश्वासने देत त्यांच्या जमिनी खरेदी करणे, त्यानंतर महसूल व नगरपालिकेतील यंत्रणेला हाताशी धरून नियमांना हरताळ फासत व्यवहार पूर्ण करणे, तसेच अतिक्रमित किंवा सरकारी जागांवर कब्जा करून त्या जागांची विक्री करणे, अशा प्रकारचे कथित रॅकेट गेल्या काही वर्षांत सक्रिय झाल्याचा आरोप होत आहे.
यामध्ये काही राजकीय पक्षांशी संबंधित कार्यकर्त्यांचाही सहभाग असल्याचा दावा नागरिकांकडून केला जात असून, शहरातील भूखंड व्यवहारांमागील आर्थिक साखळीची चौकशी झाली तर अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे.
या संपूर्ण प्रकरणात तत्कालीन संबंधित अधिकारी, महसूल व नगरपालिकेतील जबाबदार कर्मचारी आणि कथित भू-माफियांची भूमिका तपासून शासनाच्या महसुलाचे झालेले नुकसान वसूल करावे, तसेच दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आता या गंभीर आरोपांची दखल घेऊन धाराशिव जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणा सखोल चौकशीचे आदेश देणार का, की हे प्रकरणही फाईलपुरतेच मर्यादित राहणार, याकडे नळदुर्गकरांचे लक्ष लागले आहे.
याप्रकरणी पुरावे हाती लागले असुन प्रशासन संबंधिताविरुध्द कारवाई करीत नसल्याने न्यायालयात दाद मागण्याकरिता लवकरच जनहित याचिका दाखल करणार असल्याचे नगरसेवक सुधीर पोतदार यांनी सांगितले.