धाराशिवच्या शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; खरीप २०२५ च्या पीकविम्याचे ₹३३७ कोटी वाटप सुरू- आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव, दि. २८ :
धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बातमी असून, खरीप २०२५ हंगामाच्या पीकविमा भरपाईचे वितरण सुरू झाले आहे. पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण ३३७ कोटींची विमा रक्कम जमा होण्यास प्रारंभ झाल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
पीकविमा प्रकरणात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय समितीनेही दुजोरा देत पीकविमा कंपनीचे अपील फेटाळून लावले. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांना पुढील सात दिवसांत विमा रक्कम वितरित करण्याचे आदेश संबंधित कंपनीला देण्यात आले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी आता प्रत्यक्षात सुरू झाली असून, जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा होऊ लागली आहे.
नैसर्गिक संकटांमुळे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही भरपाई मोठा आर्थिक आधार ठरणार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर पीकविमा वितरणाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, "हा केवळ आर्थिक दिलासा नसून शेतकऱ्यांच्या संयमाचा, शासनावरील विश्वासाचा आणि न्यायासाठीच्या लढ्याचा विजय आहे. पात्र प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा हक्काचा पीकविमा मिळावा, यासाठी शासन कटिबद्ध आहे."