गुरूपौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र अचलबेट येथे घोड्यांच्या गोल रिंगणाचा भव्य सोहळा
पाच पालख्यांचे आगमन; हजारो भाविकांच्या उपस्थितीत कीर्तन, पालखी व रिंगण उत्सव रंगणार
मुरूम, ता. उमरगा, दि. २७ :
उमरगा तालुक्यातील कराळी-तुरोरी परिसरातील श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी गुरूपौर्णिमेनिमित्त बुधवारी (दि. २९) सायंकाळी ४.३० वाजता पारंपरिक घोड्यांच्या गोल रिंगणाचा भव्य सोहळा होणार असून, पंचक्रोशीसह महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा धार्मिक उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.
गुरूपौर्णिमेच्या औचित्याने सद्गुरू उज्वलानंद महाराज यांच्या पादुकांची पालखी यात्रा सोमवारी (दि. २७) औराद शहा (ता. निलंगा) येथून प्रारंभ झाली. रथ, नगारा, टाळकरी, वारकरी, पताकाधारी व विनेकऱ्यांच्या दिमाखदार सहभागाने पालखी हलगरा, थोर माकणी, तळीखेड पाटी, अनसरवाडा पाटी मार्गे निलंगा येथे पोहोचणार आहे. तेथे हभप. महेश महाराज (संताई आश्रम, माकणी) यांचे कीर्तन होऊन पालखीचा मुक्काम राहणार आहे.
मंगळवारी (दि. २८) पालखी निलंगा येथून दादगी, लिंबाळा, मदनसुरी मोड, भुतमुगळी, हरीजवळगा मार्गे हासोरी येथे पोहोचेल. या ठिकाणी हभप. दिवेगावकर महाराज यांच्या कीर्तन सेवेचा लाभ भाविकांना मिळणार आहे.
गुरूपौर्णिमेच्या दिवशी (दि. २९) सकाळी हासोरी येथून कासार शिर्शी, दुधनाळ पाटी, कदमापूर पाटी, कुन्हाळी, त्रिकोळी पाटी, मुळज व तुरोरी मार्गे पालखी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी दाखल होईल. याचवेळी कर्नाटकातील बसवकल्याण तालुक्यातील एकंबा, नवचंदवाडी, फुलदरवाडी व मळगीवाडी या चार गावांमधूनही पालख्या येणार आहेत. एकूण पाच पालख्यांच्या आगमनानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि जयघोषात घोड्यांच्या गोल रिंगणाचा पारंपरिक सोहळा रंगणार आहे.
रिंगणात एका घोड्यावर चोपदार तर दुसऱ्या घोड्यावर सद्गुरू उज्वलानंद महाराज यांच्या पादुका विराजमान असतील. हा सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
याच दिवशी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत हभप. अनिल महाराज पाटील (बार्शी) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून, पंचक्रोशीतील हजारो भाविक या धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
सेवक व भक्त परिवाराच्या वतीने सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरूपौर्णिमा उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.