नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह ; वैद्यकीय अधीक्षकांच्या कथित दुर्लक्षामुळे मनमानी?; चौकशी करून दोषींवर कारवाईची नागरिकांची मागणी

नळदुर्ग, दि. २५ जुलै :

 नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयातील कथित गैरव्यवस्थापन आणि आरोग्य सेवेतील त्रुटींवर 'तुळजापूर लाईव्ह' ने मागील आठवड्यात प्रकाशझोत टाकल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. रुग्णालयाचा बहुतांश कारभार कंत्राटी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर सुरू असल्याचा आरोप होत असून, या संपूर्ण प्रकरणाची आरोग्य सेवा परिमंडळ उपसंचालकांनी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक धाराशिव शहरात कथित खासगी प्रॅक्टिसमध्ये व्यस्त असल्याची चर्चा सुरू झाल्याने या प्रकरणाला अधिकच गंभीर वळण मिळाले आहे. यामुळे शासकीय आरोग्य सेवेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वैद्यकीय अधीक्षकांच्या  दुर्लक्षामुळे काही कायमस्वरूपी डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार वाढला असून, रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

सुमारे पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या उपजिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाची वेळ सकाळी ८ ते दुपारी १ आणि सायंकाळी ४ ते ७ अशी निश्चित आहे. मात्र, प्रत्यक्षात ही वेळ पाळली जात नसल्याची रुग्णांची तक्रार आहे. कायमस्वरूपी नियुक्त डॉक्टर व कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. मुख्यालयी वास्तव्यास राहून सेवा देणे अपेक्षित असतानाही  सुसज्ज निवासस्थानांमध्ये अनेक डॉक्टर व कर्मचारी वास्तव्यास नसल्याचे समोर आले आहे.

सध्या रुग्णालयाचा बहुतांश कारभार कंत्राटी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर सुरू असून, कायमस्वरूपी अधिकारी व कर्मचारी स्वतःची कामेही कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून करून घेत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेतील शिस्त आणि उत्तरदायित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रारंभीचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. इस्माईल मुल्ला यांच्या कार्यकाळात सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते, अशी भावना आजही परिसरातील नागरिक व्यक्त करतात. नळदुर्गपासून सोलापूर, तुळजापूर, धाराशिव आणि उमरगा ही शहरे दूर असल्याने परिसरातील शंभरहून अधिक गावांतील नागरिकांसाठी हे उपजिल्हा रुग्णालय महत्त्वाचे आरोग्य केंद्र ठरत आहे. त्यामुळे येथील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, धाराशिवचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांच्याशी संपर्क साधून वैद्यकीय अधीक्षकांनी खासगी प्रॅक्टिससाठी आरोग्य विभागाची परवानगी घेतली आहे का, याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी "सध्या व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू आहे," असे सांगत त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क करून दिला.
रुग्णाचा अनुभव
नळदुर्ग येथील ज्येष्ठ नागरिक भास्कर भोसले म्हणाले, "काही दिवसांपूर्वी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात गेलो. केसपेपर काढून डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेल्यानंतर माझी व्यवस्थित तपासणी न करता केवळ लक्षणे ऐकून औषधे देण्यात आली.रुग्णांना व्यवस्थित वागणुक मिळत नाही. माझे समाधान न झाल्याने अखेर खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागले."
"मुख्यालयी उपस्थिती अपेक्षित" – डॉ. जितेंद्र कानडे
जिल्हा परिषद सदस्य डॉ. जितेंद्र कानडे म्हणाले, "वैद्यकीय अधीक्षक हे प्रशासकीय व वैद्यकीय जबाबदारीचे पद आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मुख्यालयी उपस्थित राहून रुग्णालयाचे २४ तास व्यवस्थापन अपेक्षित आहे. 

ॲड. अरविंद बेडगे, तुळजापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष :
"महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम २४ नुसार कोणताही शासकीय कर्मचारी शासनाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय खासगी व्यवसाय किंवा रोजगार करू शकत नाही. हा नियम शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही लागू आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणात वस्तुस्थितीची निष्पक्ष चौकशी करून, नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास दोषींवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी. शासकीय आरोग्यसेवेवरील नागरिकांचा विश्वास अबाधित ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे."


 
Top