नागरी प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक; कथित गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी आज लाक्षणिक उपोषण

नळदुर्ग, दि. २९ जुलै :

नळदुर्ग शहरातील वाढत्या नागरी समस्या, रखडलेली विकासकामे आणि नगरपालिकेच्या प्रशासनाच्या कार्यकाळात झालेल्या कथित गैरव्यवहारांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आज (बुधवारी) नगरपालिकेसमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत वारंवार प्रश्न उपस्थित करूनही प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. यापूर्वी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्ये तसेच विविध निवेदनांच्या माध्यमातून अनेकदा प्रश्न मांडण्यात आले. मात्र त्यावर ठोस उपाययोजना न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपोषणाच्या माध्यमातून नगरसेवकांनी प्रशासनासमोर अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये घनवन वृक्षलागवड योजनेतील कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणे, घनकचरा व्यवस्थापनाच्या ठेकेदाराचा करार रद्द करून सक्षम पर्यायी व्यवस्था उभी करणे, शहरात अवादा कंपनीने उभारलेल्या कथित बेकायदेशीर टॉवरची चौकशी करून दंडासह रक्कम वसूल करणे, तसेच नगरपालिकेच्या तांत्रिक सल्लागाराला देण्यात आलेल्या कामांची तपासणी करणे या मागण्यांचा समावेश आहे.
याशिवाय, अमृत २.० पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करून शहरात नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच या योजनेसाठी खोदण्यात आलेले रस्ते त्वरित दुरुस्त करून पिचिंगची कामे पूर्ण करावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या आंदोलनाकडे शहरवासीयांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
 
Top