झरेगावच्या दत्त मठात गुरुपौर्णिमेचा भक्तिरंग; 'दासबोध'वर काका महाराजांचे प्रबोधन
तुळजापूर, दि. २९ (उमाजी गायकवाड) :
बार्शी-तुळजापूर मार्गावरील झरेगाव येथील जागृत श्री सद्गुरू दत्त मठात बुधवारी (दि. २९) गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा झाला. 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.
पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. श्री दत्त महाराजांच्या मूर्तीला पंचामृत अभिषेक, विशेष पूजाअर्चना, भजन आणि नामस्मरणाने वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले. बालगायिका राजनंदिनी लंगडे व राजमुद्रा लंगडे यांनी सादर केलेल्या सुमधुर भजनांनी भाविकांची मने जिंकली.
दुपारी गुरुवर्य काका महाराज झरेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्रवचनात समर्थ रामदास स्वामींच्या 'दासबोध' ग्रंथातील जीवनमूल्ये, गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व आणि दत्तभक्तीचे आध्यात्मिक अधिष्ठान यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बोलताना काका महाराज म्हणाले, "समर्थांचा 'दासबोध' हा केवळ ग्रंथ नसून जीवनाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक आहे. सद्गुरूंचे मार्गदर्शन आणि दासबोधातील विचार माणसाला संकटांवर मात करण्याची प्रेरणा देतात."
गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिर ट्रस्टच्या वतीने भव्य अन्नदान व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. जवळपास २० हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. बार्शी, वैराग, धाराशिव, तुळजापूरसह विविध भागांतून आलेल्या भाविकांनी मंदिर परिसर गजबजून गेला. फुलांची आकर्षक सजावटही भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.
झरेगाव ग्रामस्थ व मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण उत्सव शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
चौकट : अध्यात्माचा संदेश
"गुरुविण कोण दाखवी वाट, गुरुविण कोण बुजावी गाठ! 'दासबोध'चा अभ्यास माणसाला प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही मार्गांवर यशस्वीपणे वाटचाल करण्याची प्रेरणा देतो," असे गुरुवर्य काका महाराज झरेगावकर यांनी सांगितले.
भाविकांची भावना
"जिथे सद्गुरूंची कृपा, तिथे संकटांचे निवारण होते. झरेगावच्या गुरुपौर्णिमा सोहळ्याने भक्ती, अध्यात्म आणि समर्पणाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला," अशी भावना स्थानिक भाविक श्रीराम पोटभरे यांनी व्यक्त केली.