नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात काँग्रेसचा हल्लाबोल; १५ दिवसांत चौकशीचा लेखी शब्द घेऊनच उपोषण स्थगित
सर्वपक्षीय नेत्यांची एकजूट; कचरा, पाणी, रस्ते व कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर प्रशासनाला घेरले
नळदुर्ग, दि. २९ जुलै:( अझहर शेख) :
नळदुर्ग नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात आणि प्रशासकीय काळातील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवर काँग्रेससह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी बुधवारी जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसचे गटनेते मारुती सुदाम खारवे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद कार्यालयासमोर बुधवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आंदोलनाची तीव्रता वाढताच प्रशासनाने १५ दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
शहरातील कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासकीय काळातील कथित अनियमितता या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते. उपोषणस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
आंदोलकांनी नगरपालिकेसमोर अनेक मागण्या मांडल्या. शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप करत नियमित स्वच्छता न करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून त्याला तातडीने काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करण्यात आली. गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेला डंपिंग ग्राउंडवरील खतनिर्मिती प्रकल्प त्वरित सुरू करावा, अशीही मागणी करण्यात आली.
प्रशासकीय काळात झालेल्या वृक्षलागवडीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष चौकशी समिती (एसआयटी) मार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करावा, 'अमृत २.०' योजनेची कामे गतीने पूर्ण करून पाईपलाईनसाठी खोदलेले रस्ते तातडीने पूर्ववत करावेत, अशीही मागणी करण्यात आली.
नगरपरिषदेची परवानगी न घेता सौरऊर्जा निर्मितीसाठी उभारण्यात आलेल्या आवाडा कंपनीच्या टॉवरची चौकशी करून दंडात्मक कारवाई करावी, तसेच पारस कंपनीने अपूर्ण ठेवलेल्या विकासकामांची मुदतवाढ रद्द करून कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही करण्यात आली.
आंदोलनाची दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी,व भाजपचे नगरसेवक दत्तात्रय दासकर, तानाजी जाधव, शशिकांत पुदाले, यांनी उपोषणस्थळी येऊन गटनेते तथा नगरसेवक मारुती खारवे, उपगटनेते आकाश कुलकर्णी, सुधीर पोतदार, इमाम शेख, गफूर कुरेशी, कमलबाई गायकवाड, मन्नाबी कुरेशी, जुलेखाबेगम इनामदार, सईद बागवान,आदी
आंदोलकांशी चर्चा केली. प्रशासकीय काळातील कामांच्या चौकशीसाठी मुख्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी समिती गठित करण्यात येईल आणि १५ दिवसांच्या आत अहवाल सादर करून संबंधित प्रश्नांवर कार्यवाही केली जाईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले. त्यानंतर आंदोलकांनी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, माजी जिल्हाध्यक्ष अँड धीरज पाटील, तालुका अध्यक्ष अँड अरविंद बेडगे, शिंदे सेनेचे शहापुर जि. प.सदस्य सुनिल बनसोडे,माजी नगरसेवक नितिन कासार, अमृत पुदाले, उद्धव ठाकरे सेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण, तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकुर, नळदुर्ग शहर प्रमुख संतोष पुदाले, संदीप सुरवसे, खालेद इनामदार यांच्यासह अनेकांनी उपोषणस्थळी आंदोलनाला भेट देत पाठिंबा दिला.
"मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन"
"नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठीचा संघर्ष सुरूच राहील. प्रशासनाने १५ दिवसांत ठोस कारवाई केली नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा इशारा काँग्रेसचे गटनेते मारुती सुदाम खारवे यांनी दिला.
आता प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का आणि १५ दिवसांत चौकशी अहवाल सादर होतो का, याकडे नळदुर्गकरांचे लक्ष लागले आहे.