गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर मिल रोलर पूजन; श्री सिध्दीविनायक परिवाराचे कारखाने गळीत हंगामासाठी सज्ज
देवकुरुळी, दि. २९ जुलै :
गुरुपौर्णिमेच्या पवित्र आणि मंगलमय मुहूर्तावर श्री सिध्दीविनायक अॅग्रीटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, देवकुरुळी (युनिट क्र. १) आणि श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, खामसवाडी (युनिट क्र. २) या दोन्ही कारखान्यांमध्ये हंगाम २०२६-२७ च्या मिल रोलर पूजनाचा विधीवत समारंभ उत्साहात पार पडला. या पूजन सोहळ्याने आगामी गळीत हंगामाच्या तयारीला औपचारिक सुरुवात झाली.
श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती मीनाताई कुलकर्णी यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या पत्नी सौ. दिपाली कुलकर्णी यांच्यासह बालाजी कोरे, दिनेश कुलकर्णी, प्रतिक देवळे, गणेश कामटे, राजकुमार जाधव, अरविंद गोरे, मंगेश कुलकर्णी, प्रथमेश आवटे, विकास उबाळे उपस्थित होते.
तसेच कारखान्यातील विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, ऊस वाहतूकदार आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या समारंभास उपस्थित राहिले. धार्मिक वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्यामुळे कारखाना परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी आगामी गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी परस्पर समन्वय, शिस्त आणि कार्यक्षमतेने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आधुनिक तंत्रज्ञान, सक्षम व्यवस्थापन आणि गुणवत्तापूर्ण सेवांच्या बळावर हंगाम २०२६-२७ विक्रमी आणि यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कारखान्याच्या प्रगतीत शेतकरी, कर्मचारी आणि ऊस वाहतूकदार यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचेही उपस्थितांनी नमूद केले.