३५ वर्षांनी रंगला बीएस्सी फिशरी बॅचचा स्नेहमेळावा; सेवापूर्ती निमित्त डॉ. दस्तगीर मुजावर यांचा गौरव

नळदुर्ग, दि. २९ जुलै :

कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नळदुर्ग येथील सन १९९०-९१ च्या बीएस्सी (मत्स्यशास्त्र) शाखेतील माजी विद्यार्थ्यांचा तब्बल ३५ वर्षांनंतर स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. दीर्घ काळानंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांनी महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत भावनिक क्षण अनुभवले. यावेळी सेवापूर्ती निमित्त नेत्रतज्ज्ञ डॉ. दस्तगीर मुजावर यांचा मित्रपरिवाराच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

बीएस्सी फिशरी ग्रुपमधील सुमारे २० वर्गमित्रांनी आयोजित केलेल्या या "गेट-टुगेदर" कार्यक्रमात जुन्या आठवणी, मैत्रीचे बंध आणि महाविद्यालयीन जीवनातील विविध प्रसंगांना उजाळा मिळाला. ३५ वर्षांच्या कालावधीनंतर अनेक मित्रांची प्रत्यक्ष भेट होत असल्याने सुरुवातीला काहींना एकमेकांची ओळखही पटत नव्हती. मात्र काही क्षणांतच जुन्या आठवणींनी वातावरण भावूक आणि आनंदमय झाले.
यावेळी उपस्थितांनी मैत्रीचे महत्त्व अधोरेखित करत, "जगाच्या पाठीवर अनेक माणसे भेटतात; पण रोज भेट न होताही मनापासून आठवण काढणारे मित्र लाभणे हे भाग्याचे लक्षण आहे," अशा भावना व्यक्त केल्या.

खानापूर (ता. तुळजापूर) येथील वर्गमित्र तथा लोहारा येथे गेली ३० वर्षे नेत्रतज्ज्ञ म्हणून उल्लेखनीय सेवा बजावणारे डॉ. दस्तगीर मुजावर यांच्या सेवापूर्ती निमित्त मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला.

या स्नेहमेळाव्यास डॉ. दस्तगीर मुजावर, डॉ. दीपक जगदाळे, डॉ. सिद्धेश्वर बाड, ॲड. सयाजी शिंदे, वसंत वडगावे, राजेंद्र काळप्पा, महेश कदम, मिलिंद कुलकर्णी, सुधीर पाटील, सोमनाथ गायकवाड, राहुल लिमये, उद्धव कोठे, किसन साखरे, धनराज बरबडे, संजय पंडित, डॉ. आनंद काटकर यांच्यासह अनेक वर्गमित्र उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सिद्धेश्वर बाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रसन्न कंदले यांनी तर आभार एस. के. गायकवाड यांनी  मानले. कार्यक्रमाचा समारोप जुन्या आठवणींना उजाळा देत आणि मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्याच्या निर्धाराने झाला.
 
Top