वाढत्या चोरींनी पुजारी नगरवासीयांमध्ये धास्ती, पोलीस गस्त वाढविण्याची नागरिकांची मागणी; तुळजापूर पोलीस ठाण्यात निवेदन सादर

तुळजापूर, दि. २९ जुलै: 

शहरातील नळदुर्ग रोडलगतच्या पुजारी नगर परिसरात सातत्याने वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी नियमित पोलीस गस्त वाढवून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी बुधवारी तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, पुजारी नगर सोसायटीमध्ये सुमारे १५० हून अधिक रो-हाऊस व निवासी घरे असून मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास आहेत. गेल्या काही महिन्यांपासून परिसरात घरफोडीचे प्रयत्न, दुचाकी चोरी, घरासमोरील साहित्य, विद्युत उपकरणे तसेच इतर मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी संशयित व्यक्तींचा वाढलेला वावर चिंतेचा विषय ठरत असून, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पुजारी नगरसह हनुमान नगर, मस्के प्लॉटिंग, समता नगर, हेलिपॅड परिसर, श्रीराम नगर, शहाणे मंगल कार्यालय परिसर, फिल्टर टाकी परिसर, सहयोग नगर, छत्रपती शिवाजी नगर, विश्वनाथ नगर, हनुमान टेकडी, सप्ताळ नगर, अजिंक्य कॉलनी आणि ओम गणेश कॉलनी या भागांत नियमित पोलीस गस्त वाढविणे, रात्री विशेष गस्त पथके तैनात करणे, संशयित व्यक्तींवर बारकाईने लक्ष ठेवणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासाठी मार्गदर्शन करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

नागरिकांच्या या निवेदनाची दखल घेऊन तातडीने प्रभावी कार्यवाही करावी, जेणेकरून परिसरात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
यावेळी उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी, पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी, उमाजी गायकवाड, श्रावण पवार, सिद्धेश्वर इंगोले, विकास कोळगे, सोमनाथ पुजारी, अनिल आगलावे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
 
Top