लोकहिताच्या विषयांकडे पुन्हा दुर्लक्ष?; नळदुर्ग नगरपरिषदेची आज सर्वसाधारण सभा, वादळी चर्चेची शक्यता ; अजेंड्यावर १२ विषय

नळदुर्ग, दि. ७ जुलै :
नळदुर्ग नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा बुधवार (दि. ८) रोजी सकाळी ११ वाजता नगरपरिषद सभागृहात होणार असून, शहराच्या विकासाशी संबंधित १२ महत्त्वाच्या विषयांवर या सभेत चर्चा होणार आहे. मात्र, लोकहिताचे अनेक प्रश्न वारंवार लेखी स्वरूपात मांडूनही प्रशासनाने त्यांचा अजेंड्यात समावेश न केल्याने या सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नगरपरिषद प्रशासनाने सर्व नगरसेवकांना सभेची अधिकृत नोटीस बजावली असून, विकासकामे, प्रशासकीय निर्णय आणि विविध योजनांबाबत महत्त्वाचे ठराव सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. मात्र, सभेपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे.

पालिकेतील काँग्रेसचे गटनेते मारुती खारवे यांनी प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "आजपर्यंत झालेल्या प्रत्येक सर्वसाधारण सभेसाठी शहराच्या लोकहिताचे अनेक विषय लेखी स्वरूपात दिले. मात्र, त्यापैकी एकाही विषयाचा अजेंड्यात समावेश करण्यात आला नाही. लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने ही गंभीर बाब आहे," असे त्यांनी सांगितले. त्यामुळे बुधवारी होणारी सभा चांगलीच वादळी ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

सभेच्या अजेंड्यावर मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी, सन २०२६-२७ च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विकासकामांच्या प्रस्तावांवर चर्चा, शहरातील विविध विकास योजनांबाबत निर्णय, नवीन अंगणवाडी सुरू करण्याचा प्रस्ताव, नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासंदर्भातील विषय, तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित विविध प्रस्तावांचा समावेश आहे.

याशिवाय, नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांच्या पदस्थापना, माजी सैनिकांना मालमत्ता करात सवलत देण्याचा प्रस्ताव आदी विषयांवरही चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत.
शहराच्या विकासाच्या दृष्टीने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, लोकहिताचे प्रलंबित प्रश्न सभागृहात ऐरणीवर येणार का, याकडे नगरवासीयांचे लक्ष लागले आहे.
 विकासकामांबरोबरच प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही सभेत जोरदार चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



 
Top