ठोस आश्वासनानंतर अर्धनग्न आंदोलन स्थगित; शेतकरी संघर्ष समितीच्या मागण्यांवर पुढील आठवड्यात उच्चस्तरीय बैठक; मोजणी अहवालासह तपासणीचे उपसंचालकांचे आश्वासन
पुणे, दि. ८ जुलै :
शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने भूमी अभिलेख विभागातील प्रलंबित प्रश्नांबाबत दिलेल्या निवेदनाची दखल घेत बुधवारी जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे येथे अर्धनग्न आंदोलनाचा इशारा प्रत्यक्षात उतरविण्याची तयारी करण्यात आली होती. आंदोलनासाठी शेतकरी कार्यालयाच्या दालनात दाखल होताच प्रशासनाने तत्काळ पुढाकार घेतल्याने वातावरणात निर्माण झालेला तणाव निवळला.
उपसंचालक, भूमी अभिलेख कमलाकर हाटेकर यांनी शेतकरी प्रतिनिधींशी सविस्तर व सकारात्मक चर्चा केली. शेतकऱ्यांनी निवेदनात मांडलेल्या सर्व मागण्यांवर पुढील आठवड्यात विशेष बैठक घेण्यात येईल. संबंधित भूमी अभिलेख अधिकाऱ्यांना मोजणी अहवालासह बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले जातील. संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ तपासणी करून त्यानंतर आवश्यक त्या कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले.
प्रशासनाकडून लेखी स्वरूपात निर्णय प्रक्रियेची ग्वाही मिळाल्यानंतर शेतकरी संघर्ष समितीने नियोजित अर्धनग्न आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दिलेल्या आश्वासनाची मुदतीत पूर्तता न झाल्यास अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शेतकरी प्रतिनिधींनी यावेळी दिला.
यावेळी दिलीप जोशी, सरदारसिंग ठाकूर, राम निकम, अशोक पाटोळे, संजय कलकोटे, पांडुरंग सालपे, आजमोद्दीन शेख, पीरपाशा इनामदार, श्रीकांत पोतदार यांच्यासह शेतकरी संघर्ष समितीचे अनेक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.