स्वातंत्र्यानंतर हगलूर तांड्यावर ‘लाल परी’चे आगमन ; एसटी बससेवेचा शुभारंभ; विद्यार्थी, ग्रामस्थांसाठी दिलासादायक निर्णय
तुळजापूर, दि. ३० :
तुळजापूर तालुक्यातील हगलूर तांडा येथील ग्रामस्थांची तब्बल पाऊणशे वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) बस सेवा गुरुवारी विधिवत सुरू करण्यात आली. ‘लाल परी’च्या आगमनाने संपूर्ण तांड्यावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुरक्षित व नियमित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. अनेक वर्षांपासून एसटी सेवेच्या प्रतीक्षेत असलेल्या हगलूर तांड्याला अखेर परिवहन महामंडळाने दिलासा दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विभाग नियंत्रक अजय पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी मथुरा जाधवर, आगार प्रमुख महेश रामपुरे, सुधीर बामणकर व महेश डुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्गचे वाहतूक नियंत्रक अनिल हांडे व मुकुंद वैद्य यांनी विशेष पुढाकार घेतले.
त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाशी साधलेल्या प्रभावी समन्वयातून ही बससेवा प्रत्यक्षात सुरू झाली.
नवीन बससेवेच्या शुभारंभा निमित्त बसची विधिवत पूजा नळदुर्गच्या नगरसेविका सुमन ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सागर हजारे, बलदेव ठाकूर, जमन ठाकूर यांच्यासह ग्रामस्थ, महिला व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
या मार्गावर चालक एन. आर. रोडे आणि वाहक ए. व्ही. मुगळे सेवा बजावणार असून त्यांच्या माध्यमातून प्रवाशांना नियमित व सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
यापूर्वी हगलूर तांड्यातील विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी खुप दुरपर्य़त पायी प्रवास करावा लागत होता. आता एसटी सेवा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचणार असून शिक्षणाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. ग्रामस्थांनी या निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आभार मानले आहेत.