विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा कांता चॅरिटेबल ट्रस्टचा सेवाभावी उपक्रम
कंटेकुर येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शालेय बॅग व साहित्याचे वितरण
मुरूम, दि. ३० जुलै :
शिक्षणाला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्याच्या उद्देशाने कांता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कंटेकुर (ता. उमरगा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या बॅगा आणि आवश्यक शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी ट्रस्टच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
मंगळवारी (दि. २९) आयोजित कार्यक्रमात ट्रस्टचे संस्थापक धनराज जाधव व सचिव नूपुर जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. शिक्षण हा समाजाच्या विकासाचा भक्कम पाया असून कोणताही विद्यार्थी केवळ आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशातून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे धनराज जाधव यांनी सांगितले.
यावेळी बोलताना त्यांनी समाजसेवा ही केवळ मदत नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले. शिक्षण, आरोग्य, शेतकरी सहाय्य, युवकांना प्रोत्साहन आणि विविध सामाजिक उपक्रमांद्वारे गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचे कार्य कांता चॅरिटेबल ट्रस्ट सातत्याने करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मोलाची मदत मिळाली असून शिक्षणाबाबत समाजात सकारात्मक संदेश पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. भविष्यातही अशा सेवाभावी उपक्रमांची परंपरा कायम ठेवावी, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास सरपंच विजयाबाई जमादार, मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पटणे, केंद्रप्रमुख बबिता महानुर, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष राजश्री निंबर्गे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कमलाकर पांचाळ, उपाध्यक्ष राम मुडगे, पोलीस पाटील लक्ष्मण पांचाळ यांच्यासह शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.