कळंब तालुक्याचे ज्येष्ठ नेते विश्वंभर पाटील यांचे निधन ; हसेगाव (के)च्या विकासाला दिली नवी दिशा; राजकीय, सामाजिक क्षेत्रात हळहळ

कळंब, दि. ३० जुलै :

 कळंब तालुक्यातील ज्येष्ठ नेते, हसेगाव (के) येथील माजी सरपंच तथा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन विश्वंभर जनार्धन पाटील यांचे बुधवारी रात्री अकराच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने कळंब तालुक्याच्या राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

विश्वंभर पाटील यांनी तब्बल ३५ वर्षे हसेगाव (के)च्या सरपंचपदाची धुरा सांभाळत गावाच्या विकासाला नवी दिशा दिली. त्यांच्या कार्यकाळात सरकारी दवाखाना, पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटार व्यवस्था, जिल्हा परिषद शाळेत वृक्षलागवड, पेव्हर ब्लॉक, पेपरलेस ग्रामपंचायत तसेच सीसीटीव्ही यंत्रणा अशा अनेक विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.

गावकऱ्यांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविणारे लोकाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेतही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
ते पद्मश्री शंकर बापू आपेगावकर यांचे पुतणे, तर संदिपान महाराज हसेगावकर यांचे बंधू होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास पाटील व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष किरण पाटील यांचे ते वडील होत.

त्यांच्या पश्चात पत्नी प्रभावती विश्वंभर पाटील,
मुली मीरा विष्णू गपाट, सुवर्णा सुबोध सुरवसे, भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्यावर गुरुवारी सकाळी ११ वाजता हसेगाव (के) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना पुत्र विलास पाटील व किरण पाटील यांनी मुखाग्नी दिला. यावेळी तालुका व जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो नागरिक उपस्थित होते.
त्यांचे रक्षाविसर्जन शुक्रवारी सकाळी ८ वाजता करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.
 
Top