येडोळा–नळदुर्ग रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला ; महिनाभरात दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी
नळदुर्ग, दि. ३० जुलै :
तुळजापूर तालुक्यातील येडोळा ते नळदुर्ग या प्रमुख मार्गाची दुरवस्था झाल्याने नागरिकांसह विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी वाहने घसरून अपघात होण्याचा धोका वाढला असून, तातडीने दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
येडोळा गावातील नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारांसाठी नळदुर्ग हे मुख्य व सोयीचे केंद्र आहे. शासकीय कामकाज, बाजारपेठ, आरोग्य सेवा तसेच शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी नागरिकांना दररोज नळदुर्गला जावे लागते. मात्र, गावापासून नळदुर्गकडे जाणारा सुमारे एक किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाल्याने प्रवास जीवघेणा ठरत आहे.
विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर चिखल होवुन खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटना घडत असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याकडे संबंधित जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
येडोळा हे लहान गाव असल्याने बहुतांश कामांसाठी नागरिकांना नळदुर्गवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे या मार्गाची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच येत्या महिनाभरात रस्त्याचे काम हाती घ्यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.