काँग्रेसच्या नगराध्यक्षापासून एआयएमआयएमच्या जिल्हाध्यक्षपदापर्यंत;
शाहबाज काझींच्या राजकीय प्रवासाला नवी दिशा

नळदुर्ग, दि. २८ जुलै :

एआयएमआयएम पक्षाच्या धाराशिव  जिल्हाध्यक्षपदी नळदुर्ग येथील माजी नगराध्यक्ष शाहबाज काझी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सोशल मिडियावर या नियुक्तीची घोषणा करत काझी यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या नियुक्तीमुळे नळदुर्ग शहरातून प्रमुख राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष होण्याचा मान प्रथमच शाहबाज काझी यांना मिळाला आहे. काँग्रेस पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यापासून एआयएमआयएमच्या जिल्हाध्यक्ष पदापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास विशेष ठरला आहे.

शाहबाज काझी यांनी १९९२ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर नळदुर्ग नगरपरिषदेत प्रथमच नगरसेवक म्हणून निवडणूक जिंकली. त्यानंतर सलग सहा कार्यकाळ नगरसेवक म्हणून त्यांनी जनतेचे प्रतिनिधित्व केले. याच काळात त्यांनी एक वर्ष नगराध्यक्षपदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली.

गेल्या नगरपालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी एआयएमआयएममध्ये प्रवेश केला. पक्षाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी निवडणूक लढविली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. सुमारे चार हजार मते मिळवत ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले आणि शहरातील आपला जनाधार कायम असल्याचे सिद्ध केले.

राजकीय कारकिर्दीत त्यांनी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव, दक्षिण सोलापूरचे निरीक्षक तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या. याशिवाय संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका समितीवर सदस्य म्हणून काम केले आहे. तुळजाभवानी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले असून सध्या बालाघाट शिक्षण संस्थेचे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या या निवडीबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर, धाराशिवचे नगरसेवक अझर मुजावर, अझहर शेख यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
 
Top