आई-वडील व जामीनदाराच्या बनावट सह्यांवर ६ लाखांचे कर्ज?; तत्कालीन बँक अधिकाऱ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा
नळदुर्ग, दि. २८ जुलै :
आई-वडील तसेच जामीनदाराच्या कथित बनावट सह्यांच्या आधारे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या नळदुर्ग शाखेतून तब्बल ६ लाखांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याप्रकरणी दोघा भावांसह तत्कालीन शाखा अधिकाऱ्याविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बँकिंग व्यवहारातील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याप्रकरणी आनंद माणिकराव चिनगुंडे (वय ५३, रा. नंदगाव, ता. तुळजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिरालाल माणिकराव चिनगुंडे, बसवंत माणिकराव चिनगुंडे (दोघे रा. नंदगाव, ता. तुळजापूर) तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या नळदुर्ग शाखेचे तत्कालीन शाखा अधिकारी पंडित आसाराम जुकते यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, ३१ मे २०२५ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता फिर्यादीचे वडील माणिकराव चिनगुंडे हे आजारी असताना आणि आई इंदुमती चिनगुंडे यांचे निधन झालेले असतानाही त्यांच्या तसेच जामीनदाराच्या कथित खोट्या व बनावट सह्या करण्यात आल्या. या सह्यांच्या आधारे कर्ज खात्याचे नूतनीकरण करून ६ लाखांचे कर्ज मंजूर करण्यात आले व फिर्यादीची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी आनंद चिनगुंडे यांनी २७ जुलै २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरावरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४), ३३६(३), ३३९, ३१६(५) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.