शासनाच्या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या हाती; नळदुर्गच्या नागरिकांना लाखोंच्या धनादेशांचे वितरण

नळदुर्ग, दि. २८ जुलै :

तुळजापूर येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा'त  मंगळवारी नळदुर्ग शहरातील विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना आमदार राणाजगजितसिंह पाटील व नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या हस्ते लाखो रुपयांच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ थेट पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपविभागीय अधिकारी ओंकार कुलकर्णी, तहसीलदार अरविंद बोळंगे, अप्पर तहसीलदार प्रमोद गायकवाड, पंचायत समिती सभापती विक्रमसिंह देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून तुळजापूर विधानसभा मतदारसंघस्तरीय 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' आयोजित करण्यात आले होते.
यावेळी नळदुर्ग येथील बिस्मिल्ला महिला बचत गटाला मंजूर झालेल्या कर्जापोटी १० लाखांचा धनादेश गटाच्या सचिव सईदा बाबुलाल शेख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच रमाई आवास योजनेअंतर्गत लाभार्थी नंदा संतोष कोकणचे यांना २.५० लाखांचा धनादेश देण्यात आला. याशिवाय नगरपरिषदेचे कर्मचारी अण्णा जाधव, शहाजी येडगे आणि सौ. मयुरी जाधव यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येकी २.५० लाखांचे धनादेश वितरित करण्यात आले.

याप्रसंगी समुदाय संघटक राणुबाई सपकाळ, रेश्मा राठोड, वहिदा सौदागर यांच्यासह लाभार्थी  उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, "'शासन आपल्या दारी' ही संकल्पना अशा महसूल समाधान शिबिरांमधून प्रत्यक्षात साकार होत आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचत असून, त्यामुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होत आहे."


 
Top