निकृष्ट उड्डाणपूल कधी दुरुस्त होणार?
सर्व्हिस रोडवर अपघातांचे सत्र; हायवे प्रशासनाचे दुर्लक्ष; अणदूर ग्रामस्थांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लक्ष घालण्याची मागणी
अणदूर, दि. १६ ऑगस्ट (श्रीकांत अणदूरकर) :
सोलापूर–हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील अणदूर येथील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामाचा फटका आता वाहनधारकांसह ग्रामस्थांना बसत आहे. पूल खचल्याने व तटभिंतींना भेगा पडल्याने उद्घाटनापूर्वीच वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या या पुलाचे दुरुस्तीचे काम गेल्या चार महिन्यांपासून कासवगतीने सुरू आहे. पुलावरील वाहतूक सर्व्हिस रोडवर वळविण्यात आल्याने दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडची अक्षरशः चाळण झाली असून, दररोज छोटे-मोठे अपघात, वाहतूक कोंडी आणि ट्रॅफिक जामच्या घटना घडत आहेत. या गंभीर प्रश्नाकडे हायवे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
‘उड्डाणपूल कधी पूर्ण होणार? पुलावरून वाहने कधी धावणार?’ या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. निकृष्ट बांधकामामुळे दुरुस्तीची वेळ आली असताना हा पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला का करण्यात आला होता? या कामाला जबाबदार कोण? जनतेच्या पैशाची नासाडी कोण भरून काढणार? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावीत, अशी मागणी होत आहे.
१४ वर्षांपासून महामार्गाला ‘ग्रहण’!
सोलापूर ते कर्नाटक बॉर्डर या राष्ट्रीय महामार्गाचे काम तब्बल १४ वर्षांपासून सुरू आहे. मुदत संपूनही रस्ता आणि उड्डाणपुलाची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. विकासाला गतिरोध आणि टोलवसुली मात्र जोमात, अशी संतप्त भावना वाहनधारकांमध्ये आहे. या महामार्गावर सोलापूर–उमरगा मार्गावर आतापर्यंत २०० हून अधिक भीषण अपघात होऊन सुमारे १५० निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
अणदूर बसस्थानकासमोरील उड्डाणपुलाच्या तटभिंतींना भेगा पडणे, पुलावरील रस्ता खचणे आणि सुरक्षा कठडे बाहेरील बाजूस झुकणे यामुळे बांधकामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे उद्घाटनापूर्वीच पूल पाडून पुन्हा दुरुस्ती करण्याची नामुष्की महामार्ग प्रशासनावर आली आहे. या अतिरिक्त खर्चाचा भुर्दंड संबंधित कंत्राटदार भरणार की प्राधिकरण, याबाबतही संभ्रम आहे.
सर्व्हिस रोडची अवस्था बिकट
उड्डाणपूल बंद असल्याने संपूर्ण वाहतूक सर्व्हिस रोडवरून सुरू आहे. जड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे सर्व्हिस रोडवर मोठमोठे खड्डे पडले असून रस्ता उखडला आहे. काही ठिकाणी अरुंद व जुन्या पुलाचा वापर करण्यात आला असून तेथील रस्त्याचे कामही अर्धवट आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवल्याने घरांत पाणी
महामार्गाच्या नाली व गटारींच्या कामाची अवस्थाही गंभीर आहे. चिवरी पाटी परिसरात नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवल्याने पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. शिक्षक कॉलनी, मधुशाली नगर परिसरात तळ्यासारखे पाणी साचत असल्याने लहान मुले, वृद्ध आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी गटारींची कामे अर्धवट असून पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक पाईप टाकण्याची मागणी आहे.
पाच वर्षांपासून खड्डा ‘जैसे थे’
अनिल अणदूरकर यांच्या शॉपिंग सेंटरसमोरील मोठा खड्डा गेल्या पाच वर्षांपासून तसाच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या खड्ड्यात अनेक जण पडूनही प्रशासनाला जाग आलेली नाही. साध्या पाईपच्या साहाय्याने पाण्याचा निचरा करण्याचे कामही केले जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
टोलवसुली जोरात; अनेक कामे अर्धवट
उड्डाणपुलावर पथदिवे बसविण्यात आले असले तरी ते अर्ध्या पुलापर्यंतच आहेत. संपूर्ण पुलावर पथदिवे बसवावेत, तसेच दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी आहे. महामार्गाच्या कामांतर्गत वृक्षलागवडीसाठी तरतूद असूनही प्रत्यक्षात प्लांटेशनचा पत्ता नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रस्ता तयार करणे, पुन्हा दुरुस्ती करणे आणि काही दिवसांतच तो खराब होणे, या दुष्टचक्रात महामार्ग अडकला आहे.
पवन घुगरे यांच्या आंदोलनानंतर कंपनीचे लेखी आश्वासन
या समस्यांविरोधात सामाजिक कार्यकर्ते पवन घुगरे यांनी ५ ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात महिलांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर एच.टी.पी.एल. कंपनीने ग्रामस्थांना लेखी निवेदन देऊन तीन महिन्यांत गटारीसह संबंधित कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. आता कंपनी हे आश्वासन प्रत्यक्षात कितपत उतरवते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
प्रशासनाने जनतेच्या सहनशीलतेचा अंत न पाहता उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करावा. मधुशाली नगर ते स्टँड तसेच मलंग धाब्यापर्यंत पाण्याचा निचरा करण्यासाठी सिमेंट पाईप व गटारी कराव्यात, सर्व्हिस रोडची तातडीने दुरुस्ती करावी, चिवरी पाटीवरील बोर्डे पुलाचे काम पूर्ण करावे, अर्धवट सर्व्हिस रोड पूर्ण करावेत आणि उड्डाणपुलावरील पथदिवे बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
‘हा प्रश्न आता केवळ रस्त्याचा राहिलेला नाही; तो नागरिकांच्या जीविताचा प्रश्न आहे. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः लक्ष घालून अणदूरच्या महामार्गाची पाहणी करून कामे तातडीने मार्गी लावावीत. अन्यथा वाढता असंतोष एक दिवस जनतेला पुन्हा रस्त्यावर उतरविल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.