ऐतिहासिक देशमुखवाड्यात श्री नृसिंह-हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचा शुभारंभ
महंत इच्छागिरी महाराजांच्या हस्ते भूमिपूजन; नगराध्यक्ष बसवराज धरणे यांची प्रमुख उपस्थिती
नळदुर्ग, दि. १६ ऑगस्ट :
शहराच्या ऐतिहासिक व धार्मिक वैभवाची साक्ष देणाऱ्या ब्राह्मण गल्ली-गवळी गल्ली परिसरातील राणी गंगाबाई यांच्या ऐतिहासिक देशमुखवाड्यातील श्री नृसिंह व हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार कार्याचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला.
तुळजापूर येथील सोमवारगिरी मठाचे मठाधिपती महंत इच्छागिरी महाराज यांच्या शुभहस्ते शनिवारी, स्वातंत्र्यदिनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन व बांधकामाचा शुभारंभ झाला. यावेळी नळदुर्गचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ऐतिहासिक संदर्भ लाभलेल्या या वास्तूचे धार्मिक महत्त्व मोठे आहे. सन १६८५ मध्ये औरंगजेबाचा मुक्काम अकलूज परिसरात असताना नीरा-नृसिंहपूर येथील भगवान विष्णूच्या चौथ्या अवताराची, श्री नृसिंहाची मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी देशमुखांचे पूर्वज निलेगावकर नरसिंहराव देशमुख यांनी ती देशमुखवाड्यात विधिवत प्रतिष्ठापित केली होती. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर ही मूर्ती पुन्हा विधिवत नीरा-नृसिंहपूर येथे नेण्यात आली. मात्र, आजही या ऐतिहासिक स्थळी श्री नृसिंहाचे सिंहासन व शिळा अस्तित्वात असून, त्याच्या शेजारी श्री हनुमान मंदिरही आहे.
या प्राचीन धार्मिक स्थळाचे संवर्धन व जीर्णोद्धार करण्याचा संकल्प हिंदू युवकांनी हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भूमिपूजन सोहळा पार पडला. मंदिराचे पुजारी संकेत गुरव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून पूजन करण्यात आले.
परिसर सुशोभिकरणासाठी पालिकेचा पुढाकार
नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी मंदिर परिसराची पाहणी करून मंदिर संवर्धन समितीचे प्रमोद कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. नळदुर्ग नगरपालिकेच्या वतीने मंदिर परिसराचे सुशोभिकरण करण्यासंदर्भात ठराव करण्यात आला असून, भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील, असे धरणे यांनी सांगितले.
यावेळी गटनेते दत्तात्रय दासकर, नगरसेवक आकाश कुलकर्णी, स्वप्नील काळे, विनायक अहंकारी, विलास येडगे, वसंत रामदासी, सुशांत भूमकर, प्रसाद देशमुख, शरद देशमुख, डॉ. जितेंद्र पाटील, सुनील उकंडे, प्रमोद कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास सुहास पुराणिक, प्रदीप ग्रामोपाध्ये, अनिल धामशेट्टी, गणेश मोरडे, विजय ठाकूर, संदीप वैद्य, अजित भूमकर, उमेश जाधव, मनोज तडवळकर, संतोष नाईक, संजय जाधव, चंद्रकांत कदम, दत्तात्रय माने, आनंद कमठाणकर, नागेश गुरव, सुनील गव्हाणे, अक्षय गुरव, रोहित घोडके, दिनेश पवार यांच्यासह हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भव्य मंदिर उभारणीचा संकल्प यावेळी मंदिर संवर्धन समितीच्या वतीने महंत इच्छागिरी महाराज यांचा सत्कार करण्यात आला. ऐतिहासिक वास्तूचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व जपत येथे भव्य मंदिर उभारण्यासोबतच संपूर्ण परिसराचे सुशोभिकरण करण्याचा संकल्प करण्यात आला. मंदिराच्या उभारणी व संवर्धन कार्यासाठी भाविकांनी तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आले.