जलाशयांत ठणठणाट; खरीप पिके धोक्यात!

बोरीत ९, खंडाळ्यात ६ टक्के साठा; सोयाबीन फुलोऱ्यात, पावसाची प्रतीक्षा

नळदुर्ग, दि. २८ (शिवाजी नाईक) : पावसाळ्याचे तीन महिने उलटत आले तरी नळदुर्ग परिसरातील जलाशयांना अपेक्षित पाणीसाठ्याची प्रतीक्षा कायम आहे. धाराशिव पाटबंधारे उपविभाग, नळदुर्गच्या दि. २५ ऑगस्टच्या साप्ताहिक पाणीपातळी अहवालातून जलसाठ्यांची चिंताजनक स्थिती समोर आली आहे. त्याचा थेट परिणाम खरीप पिकांवर होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.

नळदुर्ग येथील कुरनूर (बोरी) मध्यम प्रकल्पात केवळ ९ टक्के, तर खंडाळा मध्यम प्रकल्पात अवघा ६ टक्के पाणीसाठा आहे. श्रीक्षेत्र तुळजापूर, नळदुर्ग, अणदूर यांसह परिसरातील गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी बोरी धरण महत्त्वाचे असल्याने त्यातील कमी साठ्याने चिंता वाढली आहे.


पेरणीचा खोळंबा, खर्चाचा बोजा

पावसाच्या सुरुवातीच्या काळात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप पिकांच्या पेरणीलाही काही भागात विलंब झाला होता. सोयाबीन, मूग, उडीद, तूर आदी पिकांची पेरणी केल्यानंतरही पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना बियाणे, खत व मशागतीवर केलेला खर्च वाया जाण्याची भीती आहे.

काही भागांत सोयाबीनला फुलोरा आला असून, या अवस्थेत पिकाला पावसाची नितांत गरज आहे. मात्र पाऊस लांबल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. डोंगराळ भागात पावसाचे पाणी वेगाने वाहून जात असल्याने जमिनीत अपेक्षित ओलावा टिकत नसल्याचेही चित्र आहे.

अनेक तलाव जोत्याच्या खाली

होर्टी लघु पाटबंधारे व साठवण तलाव, येडोळा, जळकोट, अणदूर, हंगरगा नळ, नंदगाव, सिंदगाव, सलगता मड्डी, कुन्सावळी, लोहगाव, शहापूर, खुदावाडी, केशेगाव, चिवरी उमरगा, फुलवाडी, देवसिंगा, वाणेगाव, वडगाव देव, सलगता दिवटी, किलज, निलेगाव, चिंकुद्रा आदी तलावांतील पाणीपातळी जोत्याच्या पातळीखाली आहे.

चाऱ्याचाही प्रश्न गंभीर

जलाशयांतील पाणी कमी असल्याचा परिणाम केवळ शेतीवरच नव्हे, तर पशुधनावरही होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी चारा उत्पादनावर परिणाम झाल्यास आगामी काळात पशुपालकांसमोर चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

दमदार पावसाची प्रतीक्षा

सप्टेंबर महिना जवळ येत असतानाही जलाशयांमध्ये अपेक्षित पाणीसाठा निर्माण झालेला नाही. त्यामुळे उर्वरित पावसाळ्यात दमदार पाऊस झाला नाही, तर खरीप पिकांसह आगामी पाणी नियोजनाचेही मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. जलाशयांच्या पाणीपातळीत वाढ होऊन शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



 
Top