बोरी धरणात केवळ ९ टक्के पाणीसाठा; तुळजापूरवर जलसंकटाचे सावट

तुळजापूर, दि. २९ ऑगस्ट : 


श्रीक्षेत्र तुळजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नळदुर्ग येथील कुरनूर (बोरी) मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने घटला असून, सध्या केवळ ९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाने ओढ दिल्याने शहराच्या आगामी पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे आव्हान नगरपरिषद प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

या पार्श्वभूमीवर तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा सभापती सागर कदम, नगरसेवक मधुकर शेळके, पाणीपुरवठा प्रमुख प्रहर्ष बरुरकर तसेच कर्मचारी सुरज भोजने व सचिन कुंभार यांनी बोरी धरणाची पाहणी केली. यावेळी धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि आगामी काळातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनाबाबत आढावा घेण्यात आला.

नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन

तुळजापूर येथे आगामी नवरात्र महोत्सवासाठी लाखो भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर अतिरिक्त ताण येणार आहे. धरणातील अत्यल्प पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन सध्या सुरू असलेली एक दिवसाआड पाणीपुरवठ्याची पद्धत तीन दिवसाआड करण्याचा प्रस्ताव नगरपरिषद सभागृहात मांडण्यात येणार आहे.

नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या पाणीपुरवठ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरपरिषद सभागृहात सविस्तर विचारविनिमय करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन

धरणातील पाणीसाठा अत्यल्प असल्याने शहरवासीयांनी उपलब्ध पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा, तसेच पाणीटंचाईच्या काळात नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा सभापती सागर कदम यांनी केले आहे.

 
Top