भरधाव दुचाकीची अज्ञात वाहनाला धडक; दोघे गंभीर जखमी
नळदुर्ग, दि. २९ ऑगस्ट :
मुंबई–हैदराबाद महामार्गावरील नळदुर्ग बायपासजवळ शिवशक्ती बेकरी परिसरात भरधाव दुचाकीने पुढील अज्ञात वाहनाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबतची माहिती सुनील भोळे यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर (कुंभारी) येथून उमरग्याकडे मोटारसायकल क्रमांक एमएच १३ डीएस ६४७९ वरून दोघे जण जात होते. नळदुर्ग बायपासवरील शिवशक्ती बेकरीजवळ दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटून समोरील अज्ञात वाहनाला धडक बसली. यात दुचाकीवरील लक्ष्मण हनुमंत आळंदकर (वय ५०) व मल्लेश तुकाराम होनमाने (वय ४०), दोघेही रा. कुंभारी, ता. जि. सोलापूर, हे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच नळदुर्ग पॉईंट येथील जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नाणीज धाम यांची रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. जखमींना उपचारासाठी नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.