पावसाने ओढ दिल्याने नळदुर्गसह तुळजापूर तालुक्यावर दुष्काळाचे सावट!

खरीप पिकांची चिंता वाढली; तलाव-जलसाठे आटले; बोरी धरणातील शेतीचा पाणी उपसा रोखण्याची मागणी

शिवाजी नाईक 
_____________________
नळदुर्ग, दि. ३१ : 

दिवसा कडक ऊन, रात्री टिपूर चांदणे अन् पहाटेच्या प्रहरी जाणवणारा गारवा... अशा बदलत्या वातावरणात वरुणराजाची मात्र अवकृपा कायम आहे. पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही नळदुर्ग परिसरासह तुळजापूर तालुक्यात अपेक्षित व दमदार पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेच्या छायेत आहेत. खरीप पिकांची वाढ खुंटली असून तलाव, साठवण बंधारे व लघु जलसाठ्यांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे नळदुर्गसह संपूर्ण तुळजापूर तालुक्यावर दुष्काळाचे सावट गडद होताना दिसत आहे.

नळदुर्ग शहरासह परिसरातील गावांमध्ये शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. सोयाबीन, तूर, उडीद, मूग यांसह अन्य खरीप पिकांना अपेक्षित पाऊस मिळत नसल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाची अशीच ओढ कायम राहिल्यास शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम निसटण्याची भीती निर्माण झाली आहे.

नळदुर्ग बोरी धरणातील पाणी उपशावर नियंत्रणाची गरज
नळदुर्ग येथील बोरी धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा भविष्यातील पिण्याच्या पाण्याच्या गरजेसाठी जपणे आवश्यक आहे. धरणातून शेतीसाठी सुरू असलेल्या पाणी उपशामुळे उपलब्ध साठ्यावर ताण येत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे बोरी धरणावरील शेतीसाठी पाणी उपसा करणारे सर्व विद्युत पंप तातडीने बंद करून पाणीसाठा संरक्षित करावा, अशी मागणी होत आहे.

आगामी काळात पावसाने दगा दिल्यास याच जलसाठ्यावर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असलेल्या नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे प्रशासनाने भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करून आतापासूनच काटेकोर नियोजन करण्याची गरज आहे.
तलाव-जलसाठ्यांची स्थिती चिंताजनक
नळदुर्ग व तुळजापूर तालुक्यातील अनेक तलाव, साठवण बंधारे आणि लघु जलसाठ्यांमध्ये अपेक्षित पाणी जमा झालेले नाही. पावसाळ्यातच जलसाठे पूर्ण क्षमतेने भरले नाहीत तर आगामी उन्हाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. काही भागांत पशुधनालाही पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

चारा-पाण्याचा प्रश्न ऐरणीवर
पावसाअभावी पिकांसोबतच पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची चिन्हे आहेत. हिरवा चारा उपलब्धतेवर परिणाम झाल्यास पशुपालकांच्या अडचणी वाढणार आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पशुधनावरही दुष्काळी परिस्थितीचा विपरीत परिणाम होण्याची भीती आहे.

पिण्याच्या पाण्याचीही चिंता
सध्या काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत असली तरी जलस्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठा न झाल्यास आगामी काळात टंचाईची तीव्रता वाढू शकते. श्री क्षेत्र तुळजापूर,  नळदुर्ग शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी प्रशासनाने संभाव्य टंचाईचा आराखडा तयार करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

दुष्काळसदृश उपाययोजनांची मागणी
पावसाअभावी खरीप पिकांचे होणारे नुकसान, जलसाठ्यांची स्थिती आणि भविष्यातील चारा-पाणी संकट लक्षात घेता प्रशासनाने तालुक्यातील परिस्थितीचे तातडीने सर्वेक्षण करावे. पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा आणि परिस्थिती गंभीर आढळल्यास दुष्काळसदृश उपाययोजना तातडीने लागू कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.

उर्वरित पावसाळ्यात दमदार पाऊस झाला नाही, तर खरीप हंगामासोबतच पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि ग्रामीण अर्थचक्रावर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ एवढ्यावर न थांबता उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन आणि संरक्षण करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
" नळदुर्ग पाटबंधारे अंतर्गत ३२ तलाव असुन पथकातील पाटबंधारे व महावितरण कर्मचाऱ्यांनी शेतीच्या विद्युत पंपाचे वीज कनेक्शन तोडले आहेत.तरीही धनदांडग्याकडून छूप्या मार्गाने तलावातील पाणी उपसा सुरू असल्याची चर्चा होत आहे."

कुरनूर (बोरी धरण) मध्यम प्रकल्पातुन  श्री क्षेत्र तुळजापूर शहराला सर्वाधिक पाणी पुरवठा करण्यात येतो. तुळजापूर,नळदुर्ग शहर, अणदुर, मुर्टा, चिंकुद्रा या पाच  गावांना वर्षाकाठी ३.१५८ दशलक्ष घनमिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. तर महिन्याकाठी ०.२६३ दलघमी पाणी पिण्यासाठी पुरवठा केला जात आहे.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top