मुंबईत उद्या भटके-विमुक्तांचा एल्गार!
‘हक्क, न्याय व विकास परिषदेतून समाजाच्या प्रश्नांवर मंथन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन

धाराशिव, दि. ३० ऑगस्ट :

विमुक्त दिनाच्या पार्श्वभूमीवर भटके-विमुक्त समाजाच्या हक्क, न्याय आणि विकासाचा आवाज बुलंद करण्यासाठी मुंबईत सोमवारी (दि. ३१) ‘शिवसेना भटके-विमुक्त हक्क, न्याय व विकास परिषद-२०२६’ आयोजित करण्यात आली आहे. सायन येथील श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृहात सकाळी ११ वाजता होणाऱ्या या राज्यस्तरीय परिषदेला शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.
मृद व जलसंधारण मंत्री तथा अखिल भारतीय शिव भटके-विमुक्त (डीएनटी) सेनेचे राष्ट्रीय नेते संजय राठोड यांच्या पुढाकारातून या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या विविध भागांतून हजारो समाजबांधव परिषदेसाठी मुंबईत दाखल होणार असल्याने या कार्यक्रमाकडे राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ब्रिटिश राजवटीत १८७१ मध्ये लागू करण्यात आलेल्या ‘क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट’मुळे अनेक भटक्या जमातींवर गुन्हेगारीचा कलंक लादला गेला. स्वातंत्र्यानंतर हा कायदा रद्द करून १९५२ मध्ये या समाजघटकांना विमुक्त करण्यात आले. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ ३१ ऑगस्ट हा ‘विमुक्त दिन’ म्हणून पाळला जातो. याच दिनाचे औचित्य साधून भटके-विमुक्त समाजाच्या भविष्यातील वाटचालीवर परिषदेत व्यापक विचारमंथन होणार आहे.

शिक्षण, रोजगार, निवारा, आर्थिक सक्षमीकरण, सामाजिक न्याय, राजकीय प्रतिनिधित्व आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासह विविध प्रश्नांवर परिषदेत चर्चा होणार आहे. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, मंत्री, खासदार, आमदार तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती यावेळी राहणार आहे.
‘उपरा’कार तथा डीएनटी अभ्यासक लक्ष्मण माने, ‘उचल्या’कार तथा डीएनटी अभ्यासक लक्ष्मण गायकवाड आणि डीएनटी फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय संयोजक दिनकर तांडेल मार्गदर्शन करणार आहेत. यासोबतच भटके-विमुक्त समाजाच्या पारंपरिक लोककला, वाद्य, वेशभूषा आणि सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडविण्यात येणार असून सुप्रसिद्ध लोककलावंत नंदेश उमप व संचाचा ‘भटके-विमुक्त लोककला संगम’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आकर्षण ठरणार आहे. तरी आयोजित या परिषदेला राज्यभरातील भटके-विमुक्त समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक संजय राठोड यांनी केले आहे.

धाराशिवमधूनही मोठी उपस्थिती
या परिषदेसाठी धाराशिव जिल्ह्यातून, विशेषतः बंजारा समाजातील मान्यवर व युवक मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होत आहेत. समाजाच्या प्रश्नांना नवी दिशा देणाऱ्या या परिषदेत युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन संजय राठोड समर्थक सचिन राठोड यांनी केले आहे.



Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top