नृसिंह-हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार सुरू
३२५ वर्षांच्या ऐतिहासिक वारशाला नवी झळाळी; दानशूर भक्तांनी सहकार्यासाठी पुढे यावे

नळदुर्ग, दि. ३० ऑगस्ट :

‘देवाच्या कामाला हातभार, पुण्याची कमाई अपार’ या भावनेतून नळदुर्ग शहरातील ऐतिहासिक देशमुखवाड्यातील श्री. नृसिंह देवतेचे सिंहासन व श्री. हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार व संवर्धनाच्या कामाला सुरुवात झाली आहे. तब्बल ३२५ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या मंदिराचे भूमिपूजन व बांधकामाचा शुभारंभ १५ ऑगस्ट रोजी करण्यात आला असून, मंदिराची पायाभरणी पूर्ण झाली आहे.

पुरातन वास्तुकलेचा ठेवा जपत मंदिराची उभारणी कोरीव व नक्षीदार दगडी चिऱ्यांमधून केली जाणार आहे. विशेष म्हणजे मंदिराची प्रवेशकमान तब्बल सव्वातीनशे वर्षे जुनी असून आजही ती भक्कमपणे उभी आहे. या ऐतिहासिक कमानीच्या दुरुस्तीचे कामही सध्या सुरू आहे.

‘जिथे श्रद्धा, तिथे देवाचा वास’ या भावनेतून मंदिर संवर्धन समितीच्या माध्यमातून जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे. मंदिराच्या उभारणीसाठी अनेक दानशूर भक्तांनी आतापर्यंत वीट, दगडी चिरे, दगडी फरशी, खडी, क्रश, शहाबादी फरशी, सिमेंट यासह विविध बांधकाम साहित्य तसेच रोख रकमेच्या स्वरूपात देणगी देऊन सहकार्य केले आहे.

मात्र, भव्य आणि ऐतिहासिक स्वरूपाचे मंदिर उभारण्यासाठी अद्याप मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य व आर्थिक निधीची आवश्यकता आहे. सर्व हिंदू बांधवांच्या सहकार्यातून या ऐतिहासिक देवस्थानाचा जीर्णोद्धार व्हावा, अशी भावना मंदिर संवर्धन समितीचे प्रमोद कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने यथाशक्ती योगदान देऊन या पवित्र व ऐतिहासिक स्थळाच्या जीर्णोद्धारास हातभार लावावा, असे आवाहन मंदिर संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top