नळदुर्गमध्ये स्वीकृत नगरसेवकपदासाठी राजकीय ‘फिल्डिंग’; भाजपच्या निष्ठावंतांना संधी की शिवसेनेची वर्णी?

धिमाजी घुगे, श्रमिक पोतदार, सुभाष कोरे, ज्ञानेश्वर घोडके यांची नावे चर्चेत; प्रविण गायकवाड यांच्या राजीनाम्याने राजकीय हालचालींना वेग

नळदुर्ग, दि. २० ऑगस्ट : 

नळदुर्ग नगरपरिषदेचे नामनिर्देशित (स्वीकृत) नगरसेवक प्रविण धनराज गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने नगरपरिषदेच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. गायकवाड यांनी दि. ४ ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांकडे, तर दि. २० ऑगस्ट रोजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्याकडे राजीनामा सादर केला. 
वैयक्तिक कारणास्तव स्वखुशीने राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
गायकवाड यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त होणाऱ्या स्वीकृत नगरसेवकपदावर आता कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता नळदुर्गच्या राजकीय वर्तुळात वाढली आहे.

 विशेषतः नगरपरिषद निवडणुकीनंतर प्रथमच भाजपला नळदुर्गमध्ये मिळालेल्या राजकीय यशाच्या पार्श्वभूमीवर या पदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

निष्ठावंतांना न्याय मिळणार?

निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये भाजपच्या जुन्या व मूळ कार्यकर्त्यांना अपेक्षित प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची चर्चा पक्षांतर्गत सुरू आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी देऊन ‘जुन्यांचा सन्मान’ केला जाणार का, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

भाजपचे धाराशिव ओबीसी आघाडी जिल्हा कोषाध्यक्ष तथा नळदुर्ग शहराचे माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे यांचे नाव आघाडीवर चर्चेत आहे. सुमारे तीन दशकांपासून पक्षाशी निष्ठेने जोडलेले घुगे यांनी संघटनवाढीसाठी काम केल्याची चर्चा आहे.
यासोबतच भाजपचे श्रमिक पोतदार यांचेही नाव चर्चेत आहे. युवा मोर्चा शहराध्यक्ष, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस तसेच भाजप तुळजापूर तालुका सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले आहे.
सुभाष कोरेंचीही जोरदार चर्चा
नगरपरिषद निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांसाठी एकदिलाने प्रयत्न करून महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जाणारे सुभाष कोरे यांचे नावही स्वीकृत नगरसेवकपदासाठी चर्चेत आहे. सामाजिक तसेच व्यापारी क्षेत्रात सक्रिय असलेले कोरे पक्षाच्या संघटनात्मक कामात योगदान देणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

मित्रपक्षाच्या वाट्याला पद जाणार?

दरम्यान, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे माजी उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके यांचे नावही संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आले आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकपद भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्याला मिळणार की मित्रपक्षाला संधी दिली जाणार, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
प्रविण गायकवाड यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी इच्छुकांची ‘फिल्डिंग’ सुरू झाली असून, अखेर पक्ष नेतृत्व कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करते, याकडे नळदुर्गकरांचे लक्ष लागले आहे. निष्ठावंतांचा सन्मान की मित्रपक्षाला संधी? या प्रश्नाचे उत्तर आता भाजपच्या नेतृत्वाच्या निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top