कुटुंबाची वीण घट्ट ठेवा; आधुनिकतेच्या प्रवाहात संस्कार जपूया - दंगलकार नितीन चंदनशिवे 

आरळी येथे कै. इंदुमती उकरंडे स्मृतिदिनानिमित्त ग्रामकन्या कृतज्ञता व आदर्श माता पुरस्कारांचे वितरण

तुळजापूर, दि.२० ऑगस्ट:

 बदलत्या काळानुसार गावचे सामाजिक चित्र आणि कुटुंबव्यवस्थेत मोठे बदल होत आहेत. आधुनिकतेचा स्वीकार करताना कुटुंबातील संवाद, जिव्हाळा, संस्कार आणि परस्परांचा आदर कमी होता कामा नये. सुख-दुःखाच्या प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून कुटुंबाची वीण घट्ट ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. घरातील ज्येष्ठांचा अनुभव आणि तरुणांची ऊर्जा यांचा सुरेख समन्वय साधला, तर कुटुंब सक्षम आणि समाज अधिक सुदृढ बनेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध दंगलकार व व्याख्याते नितीन चंदनशिवे यांनी केले.
तुळजापूर तालुक्यातील आरळी येथे कै. इंदुमती अशोकराव उकरंडे यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त ग्रामकन्या कृतज्ञता पुरस्कार व आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळा उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. मातृत्व, कुटुंबसंस्कार, सामाजिक बांधिलकी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कांचन उकरंडे होत्या. प्रमुख व्याख्याते म्हणून नितीन चंदनशिवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. रायाप्पा कटके व मन्मथ उकरंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सौ. शहनाज मूनवर पठाण यांना मातृत्वातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ. दामिनी दादाराव पारवे, सौ. जयश्री सदाफूले-पोळ आणि सोनाली रमेश यादव यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ग्रामकन्या कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महिलांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन

कै. इंदुमती उकरंडे यांच्या स्मृती जपत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवणे, हीच त्यांच्या कार्याला खरी आदरांजली ठरेल, असा सूर कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला. ग्रामीण भागातील महिलांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे निवेदन तानाजी म्हेत्रे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. शिवाजी उकरंडे यांनी केले, तर प्रशांत उकरंडे यांनी आभार मानले.
 
Top