ग्रामीण विद्यार्थ्यांच्या यशाला पदवीची सुवर्णमुद्रा; मुरूम महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ उत्साहात
मुरूम, ता. उमरगा, दि. ११ ऑगस्ट :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर संलग्नित व नगर शिक्षण विकास मंडळ संचलित श्री माधवराव पाटील महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील उत्तीर्ण विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी पदवीप्रदान समारंभ मंगळवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मान्यवरांच्या हस्ते विविध शाखांतील विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक कै. माधवराव (काका) पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलनाने झाली. नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापुराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास उमरगा जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव शरण पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. अंकुश कदम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, माजी सभापती मदन पाटील, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, योगेश राठोड, नगरसेवक गणेश अंबर, सूर्यकांत जाधव, डॉ. सतीश शेळके, प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
समारंभात नगर शिक्षण विकास मंडळाच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल शरण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच डॉ. नितीन हुलसुरे व डॉ. पंकज पाताळे यांनी पीएच.डी. पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
यानंतर बीए, बीकॉम, बीएस्सी, बीसीएस, एमए आणि एमएस्सी अभ्यासक्रमातील उत्तीर्ण विद्यार्थी-विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
प्रमुख अतिथी प्रा. डॉ. अंकुश कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धात्मक युगात मोबाईलचा अतिरेकी वापर टाळून विविध कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले. मिळालेल्या पदवीचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करावा, असेही त्यांनी सांगितले.
शरण पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख व रोजगारक्षम शिक्षण देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगत, तंत्रज्ञानाच्या युगात तरुणांनी स्वावलंबी बनण्याची गरज व्यक्त केली.
प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांनी प्रास्ताविक केले. समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक प्रा. डॉ. रवींद्र गायकवाड व परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. नरसिंग कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी केले, तर आभार डॉ. राम बजगिरे यांनी मानले.