अणदुर येथे ५८ हजारांचा गुटखा जप्त; तरुणावर गुन्हा दाखल; मोटारसायकलसह प्रतिबंधित गुटखा पोलिसांच्या ताब्यात; अण्णा चौकातील कारवाई
नळदुर्ग, दि. २१ ऑगस्ट :
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या तरुणावर नळदुर्ग पोलिसांनी कारवाई केली. अणदुर ता.तुळजापूर येथील अण्णा चौकात केलेल्या कारवाईत गुटखा, पानमसाला, तंबाखू व मोटारसायकल असा एकूण ५८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाज अमीन आकडे (वय २२, रा. अणदुर, ता. तुळजापूर) हा २० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास अणदुर येथील अण्णा चौक परिसरात प्रतिबंधित गुटखा विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगून असल्याचे आढळून आले.
नळदुर्ग पोलिसांच्या पथकाने संशयावरून तपासणी केली असता त्याच्याकडे विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखूसह अन्य प्रतिबंधित गुटखा साहित्य आढळून आले. पोलिसांनी गुटखा साहित्य व एमएच २५ एएफ ३४३० क्रमांकाची मोटारसायकल असा एकूण ५८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील कलम ५९ अन्वये नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.