तुळजापूरच्या ११ प्रभागांसाठी विकासकामांचा अजेंडा; नगरसेवक शेळकेंचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

स्वच्छतागृहांचे नूतनीकरण, व्यापारी गाळे, सीसीटीव्ही कॅमेरे; महापुरुषांच्या पुतळ्यांसाठीही तातडीने पाठपुराव्याची मागणी

तुळजापूर, दि. २६ ऑगस्ट :

तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक १ ते ११ मधील प्रलंबित नागरी प्रश्नांना चालना देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मधुकर बबनराव शेळके यांनी केली आहे. शहरातील मूलभूत सुविधांसह विविध विकासकामांचा अजेंडा मांडत त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना सहा प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले.

शहरातील सुमारे १५ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली सुलभशौचालये कालबाह्य झाली असून, त्यांची तातडीने दुरुस्ती व नूतनीकरण करून नागरिकांना स्वच्छ आणि सुविधायुक्त स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

नळदुर्ग रोड, धाराशिव रोड, लातूर रोड, सोलापूर रोड, वेताळनगर झोपडपट्टी तसेच कुंभार गल्ली परिसरात नगरपरिषदेच्या माध्यमातून व्यापारी गाळे उभारावेत. यामुळे स्थानिक नागरिकांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असेही शेळके यांनी नमूद केले आहे.

जिजाऊ माँसाहेबांच्या पुतळ्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

तुळजापूर शहरात जिजाऊ माँसाहेबांचा पुतळा उभारण्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यांबाबतही संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

प्रमुख चौक सीसीटीव्हीच्या निगराणीखाली

शहरातील वाढती वर्दळ आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करता प्रभाग क्रमांक १ ते ११ मधील प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणीही शेळके यांनी केली. सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासह वाहतूक व्यवस्थेवर देखरेख ठेवणे शक्य होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, तुळजापूर खुर्द येथील रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर नगरपरिषदेच्या माध्यमातून व्यापारी संकुलासाठी गाळे उभारावेत, अशी स्वतंत्र मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

शहरातील प्रलंबित नागरी प्रश्नांवर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून विकासकामांना गती द्यावी, अशी मागणी शेळके यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनाही देण्यात आल्या आहेत.


 
Top