नळदुर्ग शहर ‘डुक्करमुक्त’ करा; नगराध्यक्षांच्या खुर्चीला पुष्पहार घालून गांधीगिरी!
नळदुर्ग, दि. २ ६ ऑगस्ट :
शहरातील वाढता डुकरांचा उपद्रव नागरिकांच्या त्रासाचे कारण ठरत असून, शहर स्वच्छ व डुक्करमुक्त करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) अल्पसंख्याक विभागाच्या वतीने करण्यात आली. याबाबत मंगळवारी नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक अजय काकडे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला पुष्पहार घालून अनोख्या पद्धतीने ‘गांधीगिरी’ केली. शहरातील डुकरांच्या वाढत्या उपद्रवाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करत शांततामय पद्धतीने प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
शहरातील विविध रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच नागरिकांची वर्दळ असलेल्या परिसरात डुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, शहराच्या स्वच्छतेवरही त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मिरवणूक मार्गावर विशेष खबरदारीची मागणी
बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद उत्सवानिमित्त शहरात विविध धार्मिक कार्यक्रम व मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मिरवणुकीच्या मार्गावर डुकरांचा वावर होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष बशीर शेख, ताजोद्दीन शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आनंद पुदाले, ईरफान शफी कुरेशी, अजहर हमीद शेख, माजीद कुरेशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.