नळदुर्गच्या अवैध धंद्यांची ‘निष्पक्ष’ चौकशी करा; नगरसेवक खारवेंची गृह विभागाकडे धाव; वृत्तपत्रांतील बातम्यांची सत्यता तपासून दोषींवर कारवाईची मागणी
नळदुर्ग, दि. २५ ऑगस्ट :
नळदुर्ग शहर व परिसरातील कथित अवैध धंद्यांबाबत वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी. तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नगरपरिषदेचे नगरसेवक तथा काँग्रेसचे गटनेते मारुती सुदाम खारवे यांनी दि.२५ ऑगस्ट रोजी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नळदुर्ग शहर व परिसरात विविध प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याच्या बातम्या वृत्तपत्रांतून वारंवार प्रसिद्ध होत आहेत. या वृत्तांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्न उपस्थित होत असल्याचे खारवे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
याप्रकरणी यापूर्वी धाराशिव पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली होती. मात्र, संबंधित ठिकाणांचा अचूक पत्ता, नाव व लोकेशन देण्यास सांगण्यात आले. त्याचवेळी संबंधित ठिकाणांचे अधिकृत पंचनामे, सीसीटीव्ही फुटेज किंवा तपास यंत्रणेकडील जुने पुरावे उपलब्ध नसल्याने चौकशी करताना अडचणी येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
बातम्यांची सत्यता तपासण्याची मागणी
वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची कात्रणे निवेदनासोबत जोडण्यात आली आहेत. या बातम्यांमध्ये करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी खरवे यांनी केली आहे. तसेच चौकशीत तथ्य आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
गोपनीय माहिती देण्याची तयारी
शहरातील कथित अवैध धंद्यांबाबत प्रशासनाला आवश्यक ती गोपनीय माहिती उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचेही खरवे यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. त्यामुळे गृह विभाग या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचे आदेश देणार का, याकडे आता नळदुर्गकरांचे लक्ष लागले आहे.