महामार्गासाठी जमीन घेतली, मोबदला रखडवला; संतप्त शेतकऱ्यांचा मराठवाडा मुक्ती दिनी आंदोलनाचा इशारा
नळदुर्ग, दि. ११ सप्टेंबर :
राष्ट्रीय महामार्ग नळदुर्ग-अक्कलकोट रस्ता संपादनाच्या प्रक्रियेत बाधित शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे, या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत जिल्हाधिकारी धाराशिव व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास मराठवाडा मुक्ती दिनी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नळदुर्ग येथील हुतात्मा स्मारक येथे ‘आत्मचिंतन आंदोलन’ करण्यात येणार असल्याचे समितीने जाहीर केले आहे.
शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी धाराशिव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५२ नळदुर्ग-अक्कलकोट रस्ता संपादनासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही होणे अपेक्षित आहे. याचिका क्रमांक ४०२२/२०१९ तसेच त्यानंतरच्या न्यायालयीन आदेशांचा संदर्भ देत बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
न्यायालयीन आदेशानुसार झालेल्या संयुक्त मोजणी अहवालात शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या जमिनी बाधित झाल्याचे नमूद असल्याचा दावा समितीने केला आहे. मात्र, बाधित क्षेत्र संपादन करून त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात न्यायालयीन आदेशांचे पालन व्हावे म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी असतानाही शेतकऱ्यांना वारंवार प्रशासकीय प्रक्रियेत हेलपाटे मारावे लागत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
महामार्गासाठी बाधित जमिनीच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिस बळाचा वापर केला जात असल्याचा आरोप समितीने केला आहे. पोलिस बळाचा वापर न करता न्यायालयीन आदेशानुसार प्रश्न सोडवावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या आंदोलनात राष्ट्रीय महामार्गासाठी बाधित झालेले तसेच सेवानिवृत्त झालेले शेतकरी सहभागी होणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी धाराशिव, जिल्हा पोलिस अधीक्षक, तहसीलदार तुळजापूर आणि नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.
या आंदोलनात श्रीमंत फडतरे, राजेंद्र पाटील, मानसिंग ठाकुर , अजमोदीन शेख, प्रतापसिंग ठाकूर , छोटुसिंग ठाकूर , दशरथसिंग ठाकूर ,विजयकुमार पंडित, महेश घोडके, रामसिंग ठाकूर , राजेंद्रसिंग ठाकूर , अजिज बेग, बालाजी ठाकुर आदी सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे.