दुष्काळाच्या सावटातही नळदुर्ग शिवारात बैलपोळ्याचा उत्साह!

साधेपणाने बैलपूजन; पाणी-चाऱ्याच्या प्रश्नाने बळीराजा चिंतातूर

नळदुर्ग, दि. १० सप्टेंबर :

पावसाने यंदा पाठ फिरवल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असून, शेतकरी आर्थिक व अस्मानी संकटाचा सामना करीत आहे. या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा बैलपोळा सण गुरुवारी नळदुर्ग शिवारात पारंपरिक पद्धतीने व साधेपणाने साजरा करण्यात आला. दुष्काळाचे सावट असल्याने बैलांची आकर्षक सजावट टाळून शेतकऱ्यांनी शेतातच बैलांचे पूजन केले.

शेतकऱ्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असलेल्या बैलपोळ्यावर यंदा पावसाच्या अवकृपेचे सावट स्पष्टपणे जाणवले. नळदुर्ग शिवारात शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष सरदारसिंग ठाकूर व प्रताप ठाकूर यांनी आपल्या शेतातच बैलांना सजवून त्यांचे पूजन केले. यावेळी पारंपरिक पद्धतीने पोळा साजरा करण्यात आला.

दरवर्षी बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलांना नदी, नाले, पाझर तलाव, साठवण तलाव आदी ठिकाणी नेऊन आंघोळ घालतात. त्यानंतर बैलांना झुली, कंडे, घागरमाळा, पिवडी व रंगीत दोऱ्यांनी सजवून त्यांची पूजा केली जाते. मात्र, यंदा नदी-नाले व तलावांमध्ये पुरेसे पाणी नसल्याने बैलांना शेतकरी कुटुंबीयांनी घरीच आंघोळ घातली. त्यामुळे पोळ्याच्या उत्सवातील नेहमीचा जल्लोष यंदा काहीसा मावळलेला दिसून आला.



अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता केवळ खरीप पिकांचा प्रश्न नसून दुभत्या जनावरांसह पशुधनाचे संगोपन कसे करायचे, हा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. पावसाअभावी चारा व पाण्याची टंचाई वाढण्याची शक्यता असल्याने शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

दुष्काळग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तसेच गरजेनुसार तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
 
Top