स्वच्छतेत जिल्ह्यात अव्वल, पण सुविधांच्या बाबतीत ‘उणीव’!
नळदुर्ग बसस्थानकात प्रवाशांची गैरसोय; निवारा, आरक्षण, पाणी, पार्किंगसह उपाहारगृहाचा प्रश्न ऐरणीवर

नळदुर्ग, दि. ४ सप्टेंबर :
स्वच्छतेच्या बाबतीत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या नळदुर्ग एस.टी. बसस्थानकात मात्र प्रवाशांना मूलभूत सुविधांसाठी वणवण करावी लागत आहे. अपुरा प्रवासी निवारा, आसनव्यवस्थेचा अभाव, आरक्षण केंद्र नसणे, बंद जलशुद्धीकरण यंत्र, अपुरी संरक्षण भिंत आणि पार्किंगची गैरसोय यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यातच बसस्थानकातील उपाहारगृह बंद असल्याने प्रवाशांना चहा-नाश्ता व खाद्यपदार्थांसाठी बाहेर जावे लागत आहे. आगामी गणेशोत्सव व नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विभागीय वाहतूक नियंत्रक अधिकाऱ्यांनी बसस्थानकाची पाहणी करून तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.

महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या बसस्थानकात दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा असते. मात्र, बसची प्रतीक्षा करण्यासाठी असलेला प्रवासी निवारा व आसनव्यवस्था अपुरी पडत आहे. शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोकळ्या जागेत ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे निवारा वाढविण्यासह पुरेशा आसनांची व्यवस्था करण्याची गरज आहे.

संरक्षण भिंत अर्धवट; मोकाट जनावरांचा वावर
बसस्थानकाची संरक्षण भिंत अर्धवट आहे. पश्चिम दिशेला संरक्षण भिंत नसल्याने अतिक्रमणाला वाव मिळण्याची शक्यता आहे. बसस्थानकाच्या पाठीमागे खडक व मुरूमाची भर घातल्याने संरक्षण भिंतीची उंचीही कमी झाली आहे. परिणामी डुक्कर, कुत्रे व मोकाट जनावरे बसस्थानक परिसरात मुक्तपणे फिरताना दिसतात. याचा त्रास प्रवाशांसह बसचालकांनाही सहन करावा लागत आहे.

आरक्षणासाठी प्रवाशांची धावपळ
बसस्थानकात तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्याने या भागातील प्रवाशांना सोलापूर, उमरगा किंवा तुळजापूर येथे जाऊन आरक्षण करावे लागते. वेळ आणि अतिरिक्त खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याने प्रवाशांत नाराजी आहे. बसस्थानकातच आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

उपाहारगृह बंद; पाण्याचीही गैरसोय
प्रवाशांच्या सोयीसाठी असलेले उपाहारगृह बंद असल्याने लांब पल्ल्याच्या बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना चहा, नाश्ता व खाद्यपदार्थांसाठी बसस्थानकाबाहेर जावे लागते. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक व कुटुंबासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांची यामुळे गैरसोय होत आहे.

याशिवाय बसस्थानकातील जलशुद्धीकरण यंत्र बंद पडल्याने शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठीही बाहेरील दुकानांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण यंत्र तातडीने सुरू करून नियमित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

सणासुदीपूर्वी सुविधा देण्याची मागणी
गणेशोत्सव आणि नवरात्र महोत्सवाच्या काळात तुळजापूरसह परिसरातील धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर नळदुर्ग बसस्थानकात गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सणासुदीपूर्वीच प्रवासी निवारा, आसनव्यवस्था, आरक्षण केंद्र, पार्किंग, पिण्याचे पाणी, उपाहारगृह आणि संरक्षण भिंतीचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
स्वच्छतेत जिल्ह्यात अव्वल ठरलेल्या नळदुर्ग बसस्थानकाने आता प्रवाशांना दर्जेदार मूलभूत सुविधा देण्यातही आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


 
Top