युवक महोत्सवात यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा डंका, संगीत विभागात सर्वोत्कृष्ट संघाचा मान; इन्स्टॉलेशन, समूहगायन व पोस्टरमध्ये प्रथम क्रमांक
तुळजापूर,दि.४ सप्टेंबर :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धाराशिव जिल्हा युवक महोत्सव २०२६ मध्ये तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले. विविध कलाप्रकारांतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाविद्यालयाला संगीत विभागातील सर्वोत्कृष्ट संघाचा मान मिळाला.
महोत्सवात महाविद्यालयाने इन्स्टॉलेशन, समूहगायन आणि पोस्टर या प्रकारांत प्रथम क्रमांक, तर मूकअभिनयात तृतीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीनंतर बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास बोरगांवकर यांच्या हस्ते विजेत्या संघाचा सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. अशोक मर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांत आपली प्रतिभा सादर केली. प्रा. डॉ. एन. एस. कदम, डॉ. एस. एल. भालकरे आणि डॉ. सतीश महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली कु. ममता राठोड, कु. प्राजक्ता कांबळे, कु. परमेश्वरी जाधव, कु. सायली रेणके, चि. विराज क्षीरसागर, रुद्र पवार, शहाजी डोलारे आणि सुमित कामटे यांनी महोत्सवात यशस्वी सहभाग नोंदविला.
या विद्यार्थ्यांना प्रिया आगलावे, वैभव शेंडगे, संगीत विशारद प्रा. रामचंद्र ढेकळे आणि सिराज पठाण यांचे विशेष सहकार्य लाभले.
महाविद्यालयाच्या या अभूतपूर्व यशाबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार मधुकरराव चव्हाण, सचिव उल्हास बोरगांवकर, संचालक बाबुराव चव्हाण तसेच सर्व संचालकांनी कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीरंग लोखंडे आणि उपप्राचार्य डॉ. प्रवीण भाले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.