दुष्काळ जाहीर करा, नाही तर हल्लाबोल!
तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा संताप; हेक्टरी लाखाची मदत, उजनीचे पाणी अन् पीक विम्यासाठी १७ सप्टेंबरला धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
नळदुर्ग, दि. ,४ सप्टेंबर :
पावसाने पाठ फिरवल्याने तुळजापूर तालुक्यातील खरीप पिके संकटात सापडली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. सोयाबीन, तूर, ऊस यासह विविध पिकांना पावसाअभावी फटका बसत आहे. त्यामुळे तुळजापूर तालुक्यात गंभीर स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
शासनाने मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी सकाळी ८ वाजता धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर ‘तीव्र हल्लाबोल आंदोलन’ करण्यात येणार असल्याचे समितीने जाहीर केले आहे.
समन्वयक दिलीप जोशी, जिल्हाध्यक्ष सरदारसिंग ठाकूर आणि तुळजापूर तालुकाध्यक्ष व्यंकट पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, परिवहनमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागण्या मांडल्या आहेत.
पावसाने ओढ दिली; सोयाबीन वाळू लागले
तालुक्यात अर्धा पावसाळा संपूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही. महागडी खते, बियाणे व मशागतीवर खर्च करून उभे केलेले सोयाबीनचे पीक वाळू लागले आहे. तुरीसह इतर खरीप पिकांचीही अवस्था बिकट आहे. उसाची वाढ खुंटल्याने उत्पादन व वजनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळी उपाययोजना तातडीने लागू करून शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
उजनीचे पाणी केव्हा येणार?
उजनी धरणाचे पाणी तुळजापूरच्या रामधरा तलावात आणण्याच्या घोषणा सातत्याने होत असल्या, तरी प्रत्यक्ष काम अद्याप रखडले असल्याचा आरोप समितीने केला आहे. उजनी ते रामधरा पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पीक विम्याची रक्कम तत्काळ द्या
प्रलंबित पीक विमा, २५ टक्के अग्रीम पीक विमा आणि २०२५ मधील जाहीर करण्यात आलेली पीक विम्याची रक्कम अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ही थकीत रक्कम तातडीने वितरित करावी. तसेच २०२४-२५ आणि २०२५-२६ गळीत हंगामातील थकीत ऊस बिले व वाहतूक बिले देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
कृषी विभागातील गैरप्रकारांवर कारवाई करा
धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागातील कथित गैरप्रकारांप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी समितीने केली आहे.
महामार्ग प्रकरणात अधिकाऱ्यांची चौकशी करा
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५२ नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्याच्या प्रकरणात न्यायालयीन आदेशाचा अवमान व पदाचा गैरवापर केल्याच्या तक्रारीची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत यापूर्वी स्मरणपत्रे देऊनही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप समितीने केला आहे.
‘एक रुपयात पीक विमा’ पुन्हा सुरू करा
शेतकऱ्यांना संरक्षण देणारी ‘एक रुपयात पीक विमा’ योजना शासनाने बंद केली आहे. ही योजना पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांना पीक नुकसानीपासून आर्थिक सुरक्षा द्यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा १७ सप्टेंबरचे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे.