राष्ट्रीय स्तरावर कुस्ती गाजविणाऱ्या महिला खेळाडूचा टोकाचा निर्णय; तीन मुलांसह बुरुजावरून उडी, आईसह मुलाचा मृत्यू; जुळ्या मुलींपैकी एकीचा उपचारादरम्यान अंत, दुसरीची प्रकृती गंभीर
नळदुर्ग, दि. ३ सप्टेंबर :
कौटुंबिक वाद आणि तणावातून राष्ट्रीय स्तरावर कुस्तीच्या मैदानात चमकदार कामगिरी करणाऱ्या ३० वर्षीय महिला कुस्तीपटूने आपल्या तीन मुलांसह नळदुर्ग येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील उपली बुरुजावरून उडी घेतल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. या घटनेत महिला व तिच्या साडेपाच वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर अडीच वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी एकीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरी मुलगी गंभीर जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अश्विनी मनोहर पौळ (वय ३०, रा. आंबुलगा, ता. निलंगा, जि. लातूर) यांनी प्रथम साडेपाच वर्षीय मुलगा अजिंक्य याला बुरुजावरून खाली टाकले. त्यानंतर जुळ्या मुली वीरा व क्रांती यांच्यासह स्वतःही उडी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेत अश्विनी पौळ व मुलगा अजिंक्य यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी जुळ्या मुलींना तातडीने नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, क्रांती हिची प्रकृती गंभीर झाल्याने तिचा धाराशिव येथील उज्ज्वला रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. वीरा हिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे सांगण्यात आले.
तीन महिन्यांपासून माहेरी वास्तव्यास
अश्विनी यांचा विवाह २०१९-२० मध्ये मनोहर पौळ यांच्याशी झाला होता. मनोहर हे रिक्षाचालक आहेत. पतीसोबत कौटुंबिक वाद होत असल्याने अश्विनी मागील तीन महिन्यांपासून उमरगा तालुक्यातील व्हंताळ येथे वडील तानाजी मोहिते यांच्याकडे माहेरी राहत होत्या.
अश्विनी यांनी राष्ट्रीय स्तरावर विविध कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. सुमारे वर्षभरापूर्वी त्यांना महाराष्ट्र सुरक्षा दलात (एमएसएफ) मुंबई येथे नोकरी मिळाली होती. मात्र, कौटुंबिक परिस्थितीमुळे सुमारे सहा महिने नोकरी केल्यानंतर त्यांनी ती सोडल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.
आई-वडील बाहेरगावी; अनर्थ घडला
अश्विनी यांचे वडील तानाजी मोहिते हे शिक्षक आहेत. घटनेच्या वेळी ते प्रशिक्षणासाठी सकाळी लोहारा येथे गेले होते. तर अश्विनी यांची आई व भाऊ हे कर्नाटकातील आळंद तालुक्यातील हिप्परगा येथे बांधकामाच्या कामानिमित्त गेले होते. याचदरम्यान अश्विनी मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावर आल्या आणि हा हृदयद्रावक प्रकार घडला.
पोलिसांसह नागरिकांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच पुरातत्व विभागाचे कर्मचारी नागनाथ गवळी, किल्ल्यातील नागरिक तसेच नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक अत्तर सय्यद यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मुलींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेचा पुढील तपास नळदुर्ग पोलिस करीत आहेत.